Pune Crime : 'कल्ट हाऊस'ला गुन्हे शाखेचा दणका

मगरपट्टा येथील 'कल्ट टेरा हाऊस रेस्टॉरंट अँड बार' (Cult Terra House Restaurant & Bar) ला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने दणका दिला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या 'हुक्का बार' (hookah bar) वर कारवाई करण्यात आली आहे.

Cult Terra House Restaurant

'कल्ट हाऊस'ला गुन्हे शाखेचा दणका

मगरपट्टा परिसरातील बेकायदा हुक्का बारवर छापा, हडपसर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

मगरपट्टा येथील 'कल्ट टेरा हाऊस  रेस्टॉरंट अँड बार' (Cult Terra House Restaurant & Bar) ला गुन्हे शाखेच्या (Crime Branch)  सामाजिक सुरक्षा विभागाने दणका दिला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या 'हुक्का बार' (hookah bar) वर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी छापा टाकत पोलिसांनी हुक्काचे साहित्य जप्त केले असून दोघा जणांवर हडपसर पोलीस (hadpsar Police)  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्ट टेरा हाऊसमध्ये हुक्का सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील पब, बारवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. हुक्का बार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. (Pune Police) 

पोलिसांनी विविध भागातील हुक्का पार्लर आणि बेकायदा मद्य विक्री केंद्रांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मगरपट्टा परिसरात आलेल्या शिर्के रस्त्यावर 'कल्ट टेरा कल्ट हाऊस रेस्टॉरंट अँड बार' आहे. या ठिकाणी रूफ टॉप हॉटेल असून येथे बेकायदा हुक्का सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खात्री करून अचानक छापा मारला. त्यावेळी बेकायदा पद्धतीने हुक्का पुरवला जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी विविध फ्लेवरमधून ग्राहकांना हुक्का दिला जात होता. हुक्का देणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ४- अ, २१ - अ  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत १६ हजार ८४९ रुपयांचे हुक्याचे साहित्य व फ्लेवर जप्त केले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की,  'कल्ट टेरा हाऊस  रेस्टॉरंट अँड बार'मध्ये बेकायदा हुक्का सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या या माहितीच्या आधारे आम्ही हॉटेलमध्ये छापा टाकला. या ठिकाणी बेकायदा हुक्का सुरू असल्याचे निदर्शनास आले. हुक्का देणाऱ्या दोघाजणांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून  हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील-येवले, पोलीस अंमलदार अजय राणे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांनी केली. या संदर्भात बाजू जाणून घेण्यासाठी रिषू बावेजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. तसेच, याबाबतीत वकिलांशी चर्चा करून बोलू असे सांगितले.

शहरात बेकायदा रूफ टॉप हॉटेल आणि बेकायदा पबचे पेव फुटले आहे. बंडगार्डन पोलीस ठाणे, विमाननगर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या या पबमध्ये रात्री उशिरापर्यन्त मद्यविक्री सुरू असते. यासोबतच पबला परवानगी नसताना देखील याठिकाणी पब चालवले जात आहेत. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. या बेकायदा पबला राजकीय वरदहस्त आणि पोलिसांचे आशीर्वाद असल्याने कारवाईची भीती राहिलेली नाही. नाताळ, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर या पब व हॉटेल्सकडून अनेक ऑफर दिल्या जात आहेत. सोशल मिडीया तसेच छुप्या पद्धतीने याची जाहिरातबाजी केली जात आहे. महापालिकेकडून देखील या बेकायदा हॉटेल्सवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले जात नाही. ‘कॉस्मोपॉलिटन’ झालेल्या पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने शहरातील विविध भागात छुप्या आणि उघड पद्धतीने सुरू असलेले हुक्का पार्लर्स पालकांची डोकेदुखी ठरत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest