पेरू गेट पोलीस चौकीतून तीन पोलीस निलंबित
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असणाऱ्या पेरू गेट पोलीस चौकीतील एका हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पेरू गेट पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये एका तरुणीवर कोयत्याने वार झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलीस चौकीमध्ये पुढील अर्धातास पोलीस आले नसल्याने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पेरू गेट पोलीस चौकी ही विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलिसांना फोन गेल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी उपस्थित राहिले. मात्र पोलीस चौकीमध्ये कोणीच उपलब्ध नसल्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे पोलीस उपस्थित नव्हते तर दुसरीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार होण्यापासून रोखला. त्यामुळे त्यांना देखील अनेक पक्षाकडून आर्थिक भेट देण्यात आली आहे.
पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांननिलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली.