Dr. Rajesh Deshmukh : जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या नावाने बनावट 'फेसबुक' प्रोफाईल

सर्वसामान्य नागरिक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यातही फेसबुक (Facebook)हे माध्यम सर्वजण सहजरीत्या वापरतात. अनेक शासकीय अधिकारी देखील त्याचा वापर करीत असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 19 Oct 2023
  • 02:52 pm
Dr. Rajesh Deshmukh

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या नावाने बनावट 'फेसबुक' प्रोफाईल

अनेकांकडे केली पैशांची मागणी, तिसऱ्यांदा घडला बनावट प्रोफाईलचा प्रकार, सायबर पोलिसांकडून अकाऊंट डिलीट

लक्ष्मण मोरे

सर्वसामान्य नागरिक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यातही फेसबुक (Facebook)हे माध्यम सर्वजण सहजरीत्या वापरतात. अनेक शासकीय अधिकारी देखील त्याचा वापर करीत असतात. मात्र, हेच फेसबुक आता त्यांची डोकेदुखी ठरू लागले आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील फेसबुकमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांच्या नावाने बनावट फेसबुक (fake facebook) खाते तयार करून पैसे मागण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्याबाबत सलग तिसऱ्यांदा ही घटना घडली आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांचे बनावट खाते डिलीट करण्यात आलेले होते. मात्र, आता पुन्हा तिसऱ्यांदा बनावट खाते तयार करून अनेकांना पैसे मागणारे मेसेज पाठविण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी हा तपास सायबर पोलिसांकडे दिला आहे.

 कधी पोलीस अधिकारी तर कधी शासकीय अधिकारी. कधी प्रतिष्ठित व्यक्ती, तर कधी सेलिब्रिटी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून ठगवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. देशमुख यांच्या नावाने यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार करण्यात आल्याचे प्रकार घडलेले होते. त्यांचे छायाचित्र वापरून डॉ. राजेश देशमुख जिल्हाधिकारी, पुणे या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आले होते. त्यांच्या 'फ्रेंड लिस्ट'मधील मित्रांना फेसबुक मेसेंजरद्वारे मेसेज पाठवण्यात आले. घरातील अडचण, वैद्यकीय कारणे किंवा विविध अडचणी सांगून आर्थिक मदत मागण्यात आली. ही बाब अनेकांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. यापूर्वी देखील असे प्रकार दोन वेळा समोर आलेले होते. त्यावेळी देखील डॉ. देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून ही बनावट प्रोफाइल डिलीट देखील केलेली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे पुन्हा अनेकांना आर्थिक मदत मंगणाऱ्या रिक्वेस्ट गेल्या आहेत. सायबर पोलिसांनी पुन्हा त्याचा तपास सुरू केला आहे.

आतापर्यंत अशा प्रकारच्या बनावट फेसबुक प्रोफाईलद्वारे अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची विविध उदाहरणे राज्यभरात समोर आलेली आहेत. राजस्थानमधील 'अलवार' या गावामधून हे सर्व रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी एक आरोपी देखील पकडण्यात आलेला होता. त्यावेळी केवळ डॉ. देशमुखच नव्हे तर आसामचे पोलीस महासंचालक, स्थानिक पोलीस अधिकारी, मुंबईमधील पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने देखील बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करून पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आलेले होते. पुण्यामधील अनेक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या नावाने देखील फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार करण्यात आलेल्या होत्या.  ही बाब लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर, तसेच वैयक्तिक संपर्कामधून या संदर्भात कल्पना दिली होती. अनेकदा अधिकारी  समाज माध्यमातून आपल्या नावाने बनावट प्रोफाइल तयार झाल्याचे सांगतात.

सर्वसामान्य नागरिकांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून फसवणुकीचे प्रकार घडतच होते. मात्र, आता थेट, शासनाच्या सेवेतील आयएएस आणि आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावानेच बनावट प्रोफाइल तयार करून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राजस्थानातील 'अलवार' हे संपूर्ण गावच अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. या ठिकाणी घरोघरी हाच व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजमाध्यमावर असलेल्या प्रोफाइलवरून त्यांचे फोटो घेतले जातात. वैयक्तिक माहिती चोरली जाते. त्याआधारे सोशल मीडिया अकाउंट तयार केले जाते. त्यातील फ्रेंडलिस्टमधून ओळखीच्या लोकांना पर्सनल चॅटिंग करून आर्थिक मदतीचे आवाहन करणारे मेसेज पाठविले जातात. आपण सध्या खूप अडचणीत असून थोडे पैसे अकाउंटला ट्रान्सफर करा असे सांगितले जाते. त्यांना प्रतिसाद दिला की त्यांना बँक खात्याचा नंबर दिला जातो आणि त्या अकाउंटवर पैसे पाठवायला सांगितले जाते. अनेकजण त्या प्रोफाईलची खातरजमा न करता पैसे पाठवून फसवले जातात.

फेसबुकवर माझ्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. अनेकांकडे माझ्या नावाने आर्थिक मदतीची मागणी करणारे मेसेज पाठवण्यात आलेले आहेत. याबाबत मी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे आणि सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत. या बनावट प्रोफाईलवरुन आलेल्या मेसेजला कोणताही प्रतिसाद न देता ती ब्लॉक करावी.

-  डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करण्यात आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे. यापूर्वी देखील दोन वेळा त्यांच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करण्यात आलेले होते. त्यावेळी आम्ही एक आरोपी देखील पकडला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने देखील बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक केली जात आहे. लोकांनी देखील अशा बनावट मेसेज पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. फसवणूक झालेली असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

- मीनल सुपे-पाटील, 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest