Cyber Fruad : ॲप करताहेत खाती 'साफ'; 'रिमोट ॲक्सेस' द्वारे कोट्यवधी रुपयांचा दररोज अपहार

'तुम्हाला एक फोन येतो... तुमचं विजेचं बिल थकलेलं असल्याचं सांगितलं जातं... त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितलं जातं. तुम्ही ॲप डाऊनलोड करता आणि काही क्षणातच तुमचं बँक खातं रिकामं (Cyber Fruad)झालेलं असतं. लाखो रुपयांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर (Online Transfer) झालेली असते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 03:39 pm

संग्रहित छायाचित्र

लक्ष्मण मोरे
'तुम्हाला एक फोन येतो... तुमचं विजेचं बिल थकलेलं असल्याचं सांगितलं जातं... त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितलं जातं. तुम्ही ॲप डाऊनलोड करता आणि काही क्षणातच तुमचं बँक खातं रिकामं (Cyber Fruad)झालेलं असतं. लाखो रुपयांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर (Online Transfer) झालेली असते. आयुष्यभराच्या कमाईवर एका झटक्यात दरोडा पडतो आणि मनस्ताप मिळतो तो वेगळाच... त्यामुळे सावधान... काहीही झालं तरी 'एनी डेस्क'(Any desk), 'क्विक सपोर्ट', 'रस्क डेस्क' आणि 'हॉप डेस्क' ही मोबाईल ॲप (Mobile app)मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नका. या चार 'ॲप' सोबतच टेलिग्रामचा (Telegram) वापरदेखील फसवणुकीकरिता होऊ लागला आहे. सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे.

मागील काही वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर पोलिसांची डोकेदुखी त्यामुळे वाढू लागली आहे. चालू वर्षात सायबर पोलिसांकडे २०४ गुन्हे दाखल झाले असून ते तपासावर आहेत. यासोबतच फसवणूक आणि अन्य कारणांसाठी आलेले अर्ज तर वेगळेच. सायबर पोलिसांकडे आलेल्या अर्ज आणि गुन्ह्यांचा अभ्यास करण्यात आला असून फसवणुकीच्या प्रकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. डीजीटल माध्यमांचा वापर करून हजारो किलोमीटर दूर बसलेले चोरटे तुमची गोपनीय माहिती चोरून तुमचे खाते क्षणार्धात रिकामे करीत आहेत. अशा प्रकारच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. सायबर पोलिसांच्या अभ्यासात चार प्रमुख मोबाईल ॲपची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये 'एनी डेस्क', 'क्विक सपोर्ट', 'रस्क डेस्क' आणि 'हॉप डेस्क' या चार मोबाईल ॲपचा समावेश आहे.

नागरिकांना हे सायबर चोरटे फोन करून अथवा मेसेज वा ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधतात. वीज बिल थकलेले असल्याचे मेसेज पाठविले जातात. जर वीज बिल तत्काळ भरले नाही तर वीज कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जाते. तर, कधी बँकेची केवायसी अपूर्ण राहिलेली असून ती पूर्ण केली नाही, तर खाते गोठवले जाण्याची भीती घातली जाते. घाबरलेल्या ग्राहकांना कस्टमर सपोर्टच्या नावाखाली एक लिंक पाठविली जाते. या लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करायला सांगितले जाते. लिंकवर क्लिक करताच मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस या चोरट्यांकडे जातो. त्यावर जी जी माहिती ग्राहक भरतो ती माहिती या चोरट्यांना दिसत आणि कळत असते. ग्राहकाने भरलेल्या माहिती आणि आयडीचा वापर करून चोरटे खात्यामधून लाखो रुपये लंपास करतात.

देश-विदेशांत पर्यटनासाठी जाणारे नागरिक अनेकदा ऑनलाईन पद्धतीनेच हॉटेल बुकिंग करतात. बनावट संकेतस्थळांचा वापर करून किंवा क्लोनिंग करून ग्राहकाला भुलवले जाते. त्यांनादेखील अशाचप्रकारे लिंक पाठविली जाते. ही लिंक बँकेचीच असल्याचा विश्वास बसावा याकरिता बँकेचे नाव, लोगो वगैरे वापरून हुबहूब पेज तयार केले जाते. यातील काही ठराविक माहिती भरल्यानंतर ते पेज सबमिट केले जाते. तिथेच ग्राहक फसतो आणि पैसे गमावून बसतो. कधी थकीत वीज बिलांचे कारण देत... तर कधी बँक केवायसी पूर्ण करण्याच्या बहाण्याने... तर कधी हॉटेल बुकिंगच्या नावाने ग्राहकांना ही ॲप डाऊनलोड करायला सांगितली जातात. ही ॲप गुगलच्या 'प्ले स्टोअर' वर देखील उपलब्ध आहेत.

या मोबाईल ॲपचा फायदा सायबर गुन्हेगार बक्कळ कमाईकरिता करून घेत आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर चोरटे नवनवीन शक्कल लढवत आहेत. त्याला सर्वाधिक उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ नागरिकच बळी पडत आहेत. पुणे शहरात सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढले आहे. चालू वर्षात सायबर फ्रॉडच्या १,३९५ पेक्षा अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. ऑनलाईन फ्रॉड मुख्यत्वे ओटीपीची माहिती घेऊन, एटीएम कार्डद्वारे, ऑनलाईन व्यवसायाचे आमिष दाखवीत, मल्टी लेव्हल मार्केटिंग,  सोशल मीडियाच्या माध्यमातून, गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या बहाण्याने आणि हॅकिंग करून केले जात आहे. अनेकदा भूलथापा देणाऱ्या फसव्या योजना आणि सायबर चोरट्यांच्या बतावणीला ग्राहक बळी पडतात. आरोपींना पैसे ट्रॅन्सफर करताना सायबर तज्ज्ञ किंवा पोलिसांकडून सल्ला घेतला जात नाही किंवा त्यांच्या कानावर घातले जात नाही. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

टेलिग्रामवरही राहा सावध

अलीकडच्या काळात टेलिग्रामचा वापरदेखील फसवणुकीसाठी केला जाऊ लागला आहे. सुरुवातीला सिनेमांच्या पायरसीसाठी वापरला जाणारा हा प्लॅटफॉर्म आता फसवणुकीसाठी वापरला जाऊ लागला आहे. टेलिग्रामद्वारे फसवणूक करून उकळण्यात आलेली रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये वापरली जात आहे. टेलिग्रामवरून ग्राहकांना 'टास्क' देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडवले जात आहे.

काय काळजी घ्याल?

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नये.

कोणत्याही अनोळखी मेसेजला प्रतिसाद देऊ नका.

सायबर चोरट्यांनी सांगितलेले कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका.

मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक, डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नका

मोबाईलमध्ये चुकून ॲप डाऊनलोड झाल्यास तत्काळ अनइंस्टॉल करा.

मोबाईल फॉरमॅट करा. ज्यामुळे छुपे ॲप अनइंस्टॉल होतील.

कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली लिंक क्लिक करू नये. तसेच, कोणतेही अँप जर डाऊनलोड करायला सांगितले जात असेल तर ते करू नका. आपली फसवणूक होऊ शकते याची जाणीव नागरिकांनी ठेवायला हवी. ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढत चालले असून या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. एनी डेस्क, क्विक सपोर्ट, रस्ट डेस्क, हॉप डेस्क या अँपद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. फसवणूक झाली असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. 

 - मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीकरिता हेल्पलाईन

हेल्पाईन क्रमांक - 7058719371/7058719375

सायबर पोलीस ठाणे - 020 - 29710097

ई-मेल - crimecyber.pune@nic.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest