चांदणी चौकात बस आणि टेम्पो चालकांत भररस्त्यावर तुंबळ हाणामारी
ओव्हरटेक करण्यावरून चांदणी चौकाजवळ बस आणि टेम्पो चालकांत भररस्त्यावर तुंबळ हाणामारी झाली. यामुळे वाहतूक कोंडी होऊन एक लेन जाम झाली. दोन्ही चालकांनी एकमेकांना लोखंडी टॉमी, पाईपाने बेदम मारहाण केली. जखमेवर उपचार झाल्यानंतर दोघांनीही वारजे पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रारी दाखल केल्या. बस वाहक समाधान पांडुरंग देवकर आणि टेम्पो चालक कदम अशी दोघांची नावे आहेत.
बस वाहक देवकर (वय ३९, रा. श्रीकृष्णनगर, विठ्ठल मंदिरासमोर, अंबरनाथ पूर्व, ठाणे) कोल्हापूर ते विठ्ठलवाडी बसवर चालक सुनील किसन धिडे यांच्यासमवेत होते. बस चांदणी चौकाकडे जाताना वेदभवनजवळ छोटा हत्ती टेम्पो ओव्हरटेक करत होता. त्यावेळी चांदणी चौकाच्या अलीकडे वाहतूक कोंडी झाली होती. टेम्पो चालकाला ओव्हरटेक करता येत नसल्याने त्याने रागाने बसचालक धिडे यांच्याकडे पाहिले आणि घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बस आणि टेम्पो चालकाने आपली वाहने महामार्गावर थांबवली. बस चालक-वाहक खाली उतरले. टेम्पो चालकाने हातातील पाईपने बसवर वार केले. यावेळी दोन्ही चालकांनी परस्परांवर लोखंडी पाईप, टॉमीने वार केले.
त्यानंतर वाहक देवकरने वारजे पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टेम्पोचालकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक कदम याला वाहकाने लोखंडी टॉमीने मारहाण केली आहे. त्यानेही वारजे पोलीस ठाण्यात बसवाहकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धनंजय देशमुख तपास करत आहेत.