म्हाडाच्या खोल्या देण्याच्या आमिषाने गरिबांची लाखो रुपयांची फसवणूक
लक्ष्मण मोरे
मेट्रोसह विविध प्रकल्पांसाठी उठवण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना मिळालेल्या म्हाडाच्या पुनर्वसन स्कीममधील खोल्या मिळवून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ३० जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भादंवि ४२०, ४०६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२१ ते आजपर्यंत हडपसर येथील हिंगणे मळ्यामध्ये असलेल्या न्यू म्हाडा कॉलनीमध्ये घडला.
या प्रकरणी रेखा उर्फ कलावती भगवान कांबळे आणि तिचा पती भगवान कांबळे (दोघेही रा. न्यू म्हाडा कॉलनी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिनकर कांबळे (वय ६५, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर कांबळे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी महिला रेखा कांबळे ही शंकर कांबळे यांना ती म्हाडामध्ये नोकरी करीत असल्याची बतावणी करीत होती.
आम्ही अधिकाऱ्यांना हाताशी धरून म्हाडामधील पुनर्वसन योजनेतील खोल्या कमी पैशात मिळवून देतो, असे त्यांना सांगितले होते. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. यासोबतच अशाच पद्धतीने अन्य २५ ते ३० जणांची सुद्धा लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात शंकर कांबळे यांनी जाब विचारला असता रेखा यांनी स्वतःच्या जिवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी दिली आणि तिचा पती भगवान याने गुंडांमार्फत त्यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.