Sambhaji Bhide News
देवेंद्र शिरूरकर
पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्माचारी रितेश नाळे यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी (दि. २) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
भिडे कायम वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गेल्या काही दिवसांमध्ये भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे. संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी अमरावती येथील जाहीर सभेत महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे भाष्य लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढवणारे होते. त्याचबरोबर त्यांनी देशातील महापुरुषांची बदनामी केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे, निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. भिडे यांनी २०१८ मध्ये मुले जन्माला येण्याबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी भिडे म्हणाले होते की, ‘‘लग्न होऊन १२ वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती-पत्नींनी माझ्या आंब्याच्या झाडाची फळे खल्ली, तर निश्चित पोरं होईल. असं झाड आहे माझ्याकडे आहे. मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जोडप्यांना हे आंबे खायला दिलेत. पथ्य सांगितले आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे.’’भिडे यांच्या या वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल झाला होता.