Pune Crime News : फुकटच्या मद्यासाठी 'नाईट क्लब' मध्ये राडा

संपूर्ण कुटुंबासाठी एन्जॉयमेंटची ठिकाणे असणारी रेस्टॉरंट, बार आणि क्लब बनताहेत राड्याची केंद्रे; पहिल्या घटनेत पाषाणच्या रेस्टॉरंटमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण, तर दुसरीकडे आरटीओ जवळील नाईट क्लबमध्ये फुकटच्या मद्यासाठी 'एक्साईज' च्या अधिकाऱ्याने केली कर्मचाऱ्यांना मारहाण.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 17 Oct 2023
  • 01:01 pm
Pune Crime News

फुकटच्या मद्यासाठी 'नाईट क्लब' मध्ये राडा

लक्ष्मण मोरे / रोहित आठवले

नेहमीच्या 'रुटिन' मधून वेळ काढून कुटुंबासोबत 'एन्जॉयमेंट' साठी लोक हॉटेलमध्ये जात असतात. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत शांत वातावरणात संवाद साधत मजेशीर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलमध्ये भोजनाचा (Hotel) पर्याय निवडला जातो. (Pune Crime News)मात्र शहरात घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमुळे ही ठिकाणंही आता सुरक्षित राहिली नसून भांडणे, वादावादी आणि हाणामारीची केंद्रं बनली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या घटनेत सुतारवाडी-पाषाण परिसरातील हॉटेलमध्ये भोजनासाठी आलेल्या एका कुटुंबाला लहान मुलांना स्मोकिंग झोनमधून बाहेर काढल्याबद्दल त्या मुलांच्या पालकांनी बेदम मारहाण केली, तर दुसऱ्या घटनेत राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यानेच १ ऑक्टोबर रोजी फुकटच्या मद्यासाठी राजा बहादूर मिल परिसरातील 'नाईट क्लब' मध्ये जाऊन राडा केल्याचे समोर आले आहे.

यातील पहिली घटना आहे सुतारवाडी-पाषाण परिसरातील 'पंजाबिझ' हॉटेलमध्ये शनिवारी (दि. १४) रात्री झालेल्या हाणामारीची. निरंजन संजीवन हर्षे (वय ४२, रा. औंध, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील शंकर बिराजदार (वय ४०, रा. वाकड), श्लोक सुदेश होणराव (वय २७, रा. वडगाव, पुणे), सिद्धार्थ संतोष होणराव (वय ३६, रा. गुलटेकडी), सम्राट सतीश होणराव (वय ३४, रा. गुलटेकडी), शंतनू संदीप होणराव (वय ३१, रा. स्वारगेट), इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षे हे त्यांची पत्नी आणि मैत्रिणीसह सुतारवाडी-पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले. जेवण करण्यापूर्वी ते हॉटेलमधील स्मोकिंग झोनमध्ये सिगारेट पिण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे लहान मुले खेळत होती. त्यामुळे हर्षे यांनी वेटरला बोलावून, येथे खूप धूर असल्याने लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलांचे पालक तेथे गेले. त्यांनी हर्षे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हर्षे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली, तर हर्षे यांच्या मैत्रिणीला अश्लील शिवीगाळ केली. तसेच हर्षे यांच्या मित्राच्या डोक्यात कठीण वस्तू मारून दुखापत केली. एवढ्यावर न थांबता या कुटुंबाने अन्य आठ-दहा लोकांना बोलावून दाम्पत्याला हॉटेलच्या बाहेर पडण्यास मज्जाव केला. हर्षे यांना ‘तुला जिवंत सोडणार नाही’ असे धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य काही ग्राहकांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे कुटुंब कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दीड-दोन तास हा सगळा गोंधळ सुरू होता.

पंजाबिझ हॉटेलच्या स्मोकिंग झोनमध्ये अनेकजण धूम्रपान करीत होते, तर तेथे सात ते आठ लहान मुले खेळत होती.  त्यामुळे मी वेटरला बोलावून या मुलांना खाली फॅमिली सेक्शनमध्ये घेऊन जा, म्हणून सांगितले. त्यानंतर या मुलांच्या पालकांनी आणि त्यांनी बोलावलेल्या सात ते आठ जणांनी आम्हा दाम्पत्याला बेदम मारहाण केली. हॉटेलचा संपूर्ण स्टाफ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत होता, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस आल्यावर हे प्रकरण थांबले. पोलिसांनी अत्यंत किरकोळ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, आम्ही न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे फिर्यादी निरंजन हर्षे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना म्हटले आहे.

भांडणाची माहिती मिळताच आमचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तपासात आवश्यकता भासल्यास गुन्ह्यांमध्ये कलमांची वाढ केली जाईल.

-डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी

तर दुसऱ्या घटनेत राज्य उत्पादन शुक विभागाच्या एका अधिकाऱ्याने कर्तबगारीचा 'विकास' करीत राजा बहादूर मिल परिसरात असलेल्या एका 'नाईट क्लब' मध्ये जाऊन फुकटच्या मद्यासाठी धिंगाणा घालत 'आब' घालवली. ही घटना 'ड्रामा नाईन हॉटेल' मध्ये घडली. साधारणपणे १५ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर हॉटेलचालक आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये 'मांडवली' झाल्याने हे प्रकरण पोलिसांकडे जाण्यापूर्वीच थंडावल्याची चर्चा आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागात 'महत्त्वाच्या' जबाबदारीवर नेमणुकीस आहे. १ ऑक्टोबर रोजी हा अधिकारी 'ड्रामा नाईन हॉटेल' मध्ये गेला होता. हॉटेल बंद असतानाही त्याने दारूची मागणी केल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याला दारू देण्यास नकार दिल्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या अधिकाऱ्याने वेटरला जबर मारहाणदेखील केली. हॉटेलबाहेर त्याने एका जोडप्याला मारहाण केल्याचा व्हीडीओसुद्धा समोर आला आहे. हा सर्व राडा झाल्यानंतर राज्य उत्पादनच्या या अधिकाऱ्याची हॉटेल व्यावसायिकाकडून 'समजूत' काढण्यात आली. त्यानंतर हा अधिकारी तिथून निघून गेला.

हॉटेल चालक आणि संबंधित अधिकारी यांनी याबाबतीत मागील १५ दिवसांपासून मौन धारण केलेले होते. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार 'रिपोर्ट' होऊ शकला नाही. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच धावपळ उडाली. नेमका काय प्रकार घडला याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केला. दरम्यान, या अधिकाऱ्याकडे वरिष्ठांनी चौकशी करायला सुरुवात केली आहे. त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'संबंधित हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यावरून वाद झाला असण्याची शक्यता आहे,' अशी सारवासारव सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत चौकशीत नेमके काय निष्पन्न केले जाते याकडे लक्ष लागले आहे.

हॉटेलमध्ये झालेल्या प्रकाराबाबत माहिती प्राप्त झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याबाबत तक्रार आलेली होती. त्यावेळी कदाचित वाद झाला असण्याची शक्यता आहे. वास्तवात काय घडले हे चौकशीत निष्पन्न होईल.

- चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest