संग्रहित छायाचित्र
पुणे : बोपदेव घाटात तीव्र उतार आहे. या उतारावरुन जाताना अनेकवेळा वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. त्यातून अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशाच एका अपघातात दुचाकी घसरुन पडल्याने एका सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वाराला दुखापत झाली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रमेश राठोड (वय २७, रा. शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, केशवननगर, मुंढवा) असे मृत्यु झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. कडनगर, उंड्री, कोंढवा) याला दुखापत झाली आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोरेविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिनेश रासकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक मोर आणि त्याचा मित्र गणेश बोपदेव घाटातून कोंढव्याकडे निघाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास बोपदेव घाटातील वळणावर दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गणेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकी चालक अक्षय याला किरकोळ दुखापत झाली. पोलीस हवालदार रासकर तपास करत आहेत. तीव्र उतारावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. यापूर्वी बोपेदव घाटात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.