दुचाकीस्वाराने थेट पोलीसाच्या लगावली कानशिलात, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार
विना हेल्मेट दुचाकीस्वाराला थांबविल्यानंतर त्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. त्यामुळे हुज्जत घालणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, तेथे दुचाकीस्वाराचे थेट वाहतुक पोलीसांच्याच कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २८ मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गौरव हरीष वालावकर (वय २९) आणि सुचेता चेतन घुले (वय २८, दोघे रा. चिंतामणी रेसिडेन्सी, बिबवेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार रामदास बांदल (वय ५७) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या विमल विहार सोसायटीजवळून जात असताना फिर्यादी सहायक पोलीस निरीखक बरडे आणि इतर सहकाऱ्यांनी दुचाकीस्वार गौरव वालावकरला थांबविले. यावेळी दुचाकीवरुन जाताना हेल्मेट नसल्याने पोलिसांनी त्याला आरसी बुक व लायसन्स दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याने कोणतीही कागदपत्रे न दाखवता बरडे यांच्यासोबत हुज्जत घातली.
पोलीसांशी हुज्जत घालत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याने आपली मैत्रिणी सुचेताला बोलावून घेतले. त्यानंतर गौरवने बरडे यांच्या थेट कानाखाली मारली. मात्र, कानाखाली मारल्यानंतर पोलीसांनी गौरवसह त्याच्या मैत्रिणीला देखील अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.