संग्रहित छायाचित्र
बारामती तालुक्यातील लामजेवाडी घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या अपघातात दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टाटा हॉरीअर या गाडीला (क्रमांक बी.आर.ओ.३/ए.एम. ९९९९) हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कृष्णा इशू सिंग (वय २१ वर्ष, रा. बिहार) हा गाडी चालवत होता. बारामतीहून भिगवणकडे भरधाव वेगाने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणावर वाहनाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील चेष्टा ज्योतीप्रकाश बिश्नोई (वय २१) गंभीर जखमी झाली. तर दक्षु विष्णु शर्मा आणि आदित्य जयदास कनसे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी भिगवण मेडीकेअर हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
या घटनेची नोंद भिगवण पोलीस स्टेशन येथे फेटल मोटार अपघात म्हणून झाली आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे. प्राथमिक तपासानुसार, वाहनाचा भरधाव वेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भरधाव वेगाने वाहन चालवण्यामुळे झालेल्या या अपघाताने दोन जणांना जीव गमवावा लागला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताबद्दल माहिती देताना सहा. पोलीस निरीक्षक विनोद महागडे म्हणाले की, अपघातावेळी गाडी चालवणारे तरुण तरुणी यांनी मद्यप्राशन केले होते का? याचाही तपास सुरु आहे. गाडीत असलेले तरुण- तरुणी बारामतीतील एका खाजगी संस्थेत वैमानिकाचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या प्रकरणाची कल्पना त्यांच्या पालकांना दिलेली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.