बाबा सिद्दीकी हत्येचे पुणे कनेक्शन, वारजेतील डेअरी मालकाचा हत्येच्या कटात सहभाग?
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रवीण लोणकर याला पुण्यातून ताब्यात घेतले. प्रवीण लोणकर हा सराईत शुभम लोणकर याचा भाऊ आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची फेसबुक पोस्ट करणारा शुब्बू लोणकर हाच शुभम लोणकर असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र शुभम लोणकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट शुब्बू लोणकर नावाच्या फेसबुक हँडलवर सगळ्यात आधी पोस्ट करण्यात आली. ही फेसबुक पोस्ट करणारा शुब्बू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास सध्या केला जात आहे. ही पोस्ट करणारा शुब्बू लोणकर हा शुभम लोणकर असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. तसेच शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर असे या आरोपीचे नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शुभम रामेश्वर लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्हरी या गावातील आहे. तो एक सराईत असून मागील काही दिवसांपासून तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आहे. शुब्बू लोणकर हाच शुभम रामेश्वर लोणकर असल्याचा संशय आल्याने अकोला आणि अकोट पोलीस थेट त्याच्या नेव्हरी या गावी पोहोचले. मात्र शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्याच्या घरी कोणीही नसल्याचे पोलिसांना आढळून आले. शुभमने आपल्या भाऊ प्रवीणसोबत जून २०२४ लाच गाव सोडले होते. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच, शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांच्यासह अकोट आणि अंजनगाव सुर्जी इथल्या दहा जणांवर आर्म्स अॅक्टसह विविध कलमान्वये अकोट शहर पोलीस स्टेशन येथे १६ जानेवारीला गुन्हे दाखल झाले होते.
शुभम लोणकर याचे पुणे कनेक्शन
शुभम आणि प्रवीण लोणकर हे पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघे भाऊ पुण्यातील वारजे परिसरात डेअरीचा व्यवसाय करत होते. लोणकर डेअरी असे या डेअरीचे नाव आहे. प्रवीण लोणकर यानेच आरोपी धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि कर्नीलसिंह यांना राहण्यासाठी खोली भाड्याने दिली होती. हे तिघे पुण्यात लोणकर याच्या डेअरी शेजारीच बालाजी स्क्रॅप सेंटर या भंगाराच्या दुकानात कामाला होते. इथूनच ते मुंबईला जावून रेकी करत होते. त्यासाठी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले होते. ही माहिती समोर आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी प्रविण लोणकर याला पुण्यातून ताब्यात घेतले. पोलीस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत.