संग्रहित छायाचित्र
लक्ष्मण मोरे
बंदोबस्तावर निघालेल्या सहायक पोलीस आयुक्तांचा (Assistant Commissioner of Police)पाठलाग करत त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी घालणे आणि त्यांच्या अंगावर धावून (Pune Police News) धक्काबुक्की करणे दोन महिलांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून जबाब नोंदवून घेण्यासाठी या महिलांनी हा गोंधळ घातला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान पोल्ट्री चौक खडकी ते संगमवाडी बीआरटी बस थांब्या दरम्यान घडली. येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police)गुन्हा दाखल झाला आहे.
येरवडा पोलिसांनी २५ आणि २४ वर्षीय दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तौसिफ रसूल सय्यद (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यातील २५ वर्षीय महिला आणि त्यांच्या पतीचा पान शॉपचा व्यवसाय आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची पानाची टपरी आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप करपे हे गस्तीवर असताना त्यांना टपरी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसले. त्यांनी टपरी बंद करण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी महिला आणि त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. या घटनेची स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत खटलाही दाखल केला. दुसऱ्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे हे गस्तीवर असताना त्यांना पुन्हा रात्री उशिरापर्यंत ही टपरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना या ठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयी कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी २४ वर्षीय महिलेने शेवाळे यांच्यासोबत वाद घातला.
या संदर्भात या महिलांनी उपनिरीक्षक शेवाळे आणि करपे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केले होते. या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिले. त्यानुसार, ही चौकशी येरवडा विभागाचे सहायक आयुक्त संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी पाटील यांना लोणीकंद पोलीस ठाण्याची व्हिजिट होती. या चौकशीसाठी त्यांनी ही भेट रद्द केली. या महिलांना त्यांनी दुपारी साडेबारा वाजता जबाब देण्यासाठी बोलावले. परंतु, या महिला वेळेत आल्या नाहीत. त्यांना पोलिसांकडून वारंवार फोन करण्यात येत होते. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. या महिला साडेतीन वाजता जबाब नोंदविण्यासाठी आल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईकडे जाणार होते. तसेच, क्रिकेट मॅचकरिता बांगलादेशची टीम पुण्यात येणार होती. विमानतळावर या महत्त्वाच्या घटना असल्याने सहायक आयुक्त पाटील तिकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी या महिलांनी त्यांना विनंती करून थांबवले.
दरम्यान, या गदारोळात संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जबाब घेणे सुरू करण्यात आले. सव्वा आठ वाजता जबाब नोंदविण्याचे काम संपले. सहायक आयुक्त पाटील यांनी हा जबाब वाचलेला नव्हता. त्यांना विमानतळावर जायचे होते. तसेच, भारत-बांगला मॅचनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्तदेखील होता. या महिलांनी पाटील यांना जबाब न देता तो त्यांचे पती आणि वकील यांना पाठवितो आणि नंतर फायनल करू असे सांगितले. त्यावेळी पाटील यांनी त्यांना, 'आपण दिलेला जबाब सोबत घेऊन जा. वकील आणि पती यांना दाखवून आवश्यकतेनुसार सुधारणा करून परत सोमवारी वकिलांसाह घेऊन या' असे सांगितले. त्या जबाबामध्ये काही त्रुटी होत्या. त्याबाबत पोलिसांनी विचारणा करताच प्रत्येक त्रुटीवर त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. यामध्ये रात्री पावणे नऊ वाजले. सहायक आयुक्त पाटील हे या महिलांना 'सोमवारी पतीला घेऊन या' असे सांगून तिथून निघाले.
ते शासकीय गाडीमध्ये बसून निघाल्यानंतर या दोन्ही महिला त्यांच्या दुचाकीवरून पाठीमागे आल्या. काचेवर हात आपटून चिडचिड करायला सुरुवात केली. त्यावेळी पाटील यांनी, 'आपण दिलेल्या वेळेत का आला नाहीत,' असा प्रश्न केला. त्यांची गाडी संगमवाडीच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी संगमवाडी बीआरटी बस थांब्याजवळ या महिलांनी त्यांच्या शासकीय गाडीला दुचाकी आडवी घातली. त्यांची गाडी थांबवत व्हीडीओ शूटिंग सुरू केले. त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, पाटील यांना त्या खाली उतरण्यास सांगत होत्या. पाटील यांनी महिला पोलीस अधिकारी घटनास्थळी बोलावल्या. या महिला अधिकारी येईपर्यंत त्यांच्याशी वाद घालत या महिला अंगावर धावून गेल्या. त्यांना धक्का देऊन शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. दरम्यान, महिला अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांना पाहताच या महिला तेथून निसटल्या. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.