संग्रहित छायाचित्र
पार्टीमध्ये जेवण वाढत असताना एक केटरर फोनवर बोलला म्हणून बियरची बाटली फोडून पायात घुसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत केटररच्या पायाला दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेश रंजन दास असे फिर्यादीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश रंजन दास (वय २५, रा. तारापुरी रोड, पुणे कॅम्प. मूळगाव- बादकुल्ला, ता-पातुली, जिल्हा नादिया, पश्चिम बंगाल) फिर्यादी हे लेडीज क्लबमध्ये दामोदर कुनवार, गोविंद बिस्वास, रेदाई दास, सागर सरकार जयंत घोष, महेश शिंदे, प्रसाद संदा यांच्यासोबत राहात आहेत. लेडीज क्लबमध्ये ते केटरर म्हणून काम करतात. फिर्यादी दास यांचे साथीदार वेटर, शेफ यांचे काम करतात. लेडीज क्लबचा मालक सतीश राय असून त्याचे व्यवस्थापक रमन मुळे आहेत.
चंद्रकांत सोळंकी (रा. बंगला नं. ४६, फ्लोरिडा ईस्टेट सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी २० ऑगस्ट रोजी लेडीज क्लब पुणे कॅम्प या ठिकाणी जाऊन श्री केटरर्स यांच्याकडे जेवण पार्टीची ऑर्डर दिली. २६ ऑगस्ट रोजी १०० व्यक्तींसाठी जेवण पाहिजे असे सांगून ऑर्डर निश्चित केली. त्याप्रमाणे फिर्यादी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या दरम्यान चंद्रकांत सोळंकी यांच्या बंगला नं ४६, फ्लोरिडा ईस्टेट सोसायटी, केशवनगर, मुंढवा या ठिकाणी पोहोचले. त्याच्यासोबत दामोदर कुनवार, गोविंद बिस्वास, रेदाई दास, सागर सरकार, जयंत घोष, महेश शिंदे, प्रसाद संदा हे वेटर, शेफ आणि व्यवस्थापक देखील त्या ठिकाणी ऑर्डर घेऊन पोहोचले. त्यांनी सोबत जेवण, जेवणासाठीचे सर्व साहित्य बरोबर नेले होते.
फिर्यादी राजेश दास त्याच्या सर्व स्टाफसह जेवण घेऊन पोहोचल्यावर त्या सर्वांनी मिळून पार्टीच्या जेवणाचा सर्व सेटअप तयार केला. रात्री ७:३० च्या दरम्यान पार्टीची सुरुवात झाली. त्यावेळी फिर्यादी स्वतः त्यांच्या इतर स्टाफसह मिळून पार्टीमधील लोकांना खाद्यपदार्थ वाढण्याचे काम करत होते. रात्री १०:३० च्या सुमारास फिर्यादी दास यांना एक फोन आला. ते फोनवर बोलत होते. मात्र इतर स्टाफ जेवण वाढण्याचे काम करत होता. त्यावेळी फोनवर बोलण्याचा राग आल्याने चंद्रकांत सोळंकी आणि त्यांच्या सोबतच्या त्यांच्या नातेवाईकाने दास यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. त्यानंतर एकाने बियरची बाटली फोडून फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यात खुपसली. बाटलीच्या काचा गुडघ्यात घुसल्याने जखम झाली. त्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे फिर्यादी घाबरले आणि तेथून निसटून बंगल्याबाहेर पडले. पायावरच्या भळभळत्या जखमेवर उपचार करण्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. त्या ठिकाणी वैद्यकीय वैद्यकीय उपचार केले. तब्बेत बरी नसल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याऐवजी आराम केला. सोमवारी (२८ ऑगस्ट) त्यांनी मुंढवा पोलिसांकडे जाऊन या प्रकरणी तक्रार दिली.
पोलिसांनी चंद्रकांत सोळंकी आणि त्यांचा नातेवाईक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक समीर करपे करत आहेत.