चारित्र्याच्या संशयावरून घोटला पत्नीचा गळा पतीला अटक
पुणे : पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होत असलेला वाद आणि भांडणाच्या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. खुनानंतर अकस्मात मृत्यूचा बनाव रचण्यात आला. या महिलेच्या प्रेताचे शवविच्छेदन केल्यानंतर हा खूनच असल्याचे उघडकीस आले. समर्थ पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने या खुनाची कबुली दिली.
नूरजहा शफिक चौधरी (वय ३२) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती शफिक सुखरूलाह चौधरी (वय ३४, रा. सिद्धार्थ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठेतील बाबाजान दर्गा येथील मंजुळाबाई चाळ या ठिकाणी सोमवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरजहा चौधरी हिचा घरामध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे समर्थ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या महिलेच्या गळ्यावर 16 सेंटीमीटर लांबीचा आणि दीड सेंटीमीटर रुंदीचा लालसर-काळसर व्रण दिसत होता.
तिच्या प्रेताचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण हे गळा दाबल्याने मृत्यू असे नमूद करण्यात आले. या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीमध्ये आणि शवविच्छेदन अहवालामध्ये विरोधाभास असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खुनाची कबुली दिली. शफिक याने ओढणी दोरीसारखी पिळून पत्नीच्या गळ्याभोवती आवळून पत्नीचा खून केल्याचे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माळी करीत आहेत.