लष्करी जवानांची घरेही असुरक्षित; चांदीची भांडी, ऐतिहासिक नाणी केली लंपास
निवृत्त लष्करी जवानांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी रात्री घुसून चोऱ्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील चांदीची भांडी, ऐतिहासिक नाणी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी निवृत्त जवान सत्यप्रकाश नथुराम यादव (वय ६०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात भुरट्या चोरांविरोधात तक्रार दिली आहे. मंगळवारी (२९) रात्री ते बुधवारी (दि. ३०) पहाटे यादरम्यान ही घटना घडली.
सत्यप्रकाश यादव हे लोहगाव येथील एकतानगर परिसरात असलेल्या गुरुद्वारा कॉलनीत राहतात. ते सीआयएसएफमध्ये सेवा बजावली. पुणे विमानतळावर सेवेत असताना ते निरीक्षक पदावरुन डिसेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले. मंगळावरी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी घराचे गेट बंद करून पहिल्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यांची मुलगी निधी यादव या नेहमी खालच्या मजल्यावर झोपत असतात. मात्र मंगळवारी सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. बुधवारी सकाळी सहा वाजतादरम्यान फिर्यादी झोपेतून उठून वरच्या मजल्यावरून खाली आले. खालच्या मजल्यावरील एका खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यावेळी फिर्यादींनी मुलीस खाली बोलावले आणि घरामध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे निदर्शनास आले. सत्यप्रकाश यादव यांची मुलगी निधी यांनी घरातील सर्व साहित्याची तपासणी केली. त्यावेळी कपाटातील चांदीचे ताट, वाटी, एेतिहासिक नाणी आणि सुट्टे पैसे चोरीस गेल्याचे समजले.
त्याचवेळी फिर्यादी यांच्या शेजारी राहत असलेल्या एकाच्या घरी चोरी झाली असल्याचे त्यांना समजले. एकतानगरमधील प्रशांत हिमांशू मुजुमदार (वय ४०) तसेच त्यांच्या घरात भाड्याने राहणारे संदीप जिगरा यांच्याकडील चांदीचे पैंजण चोरीस गेले. फिर्यादी आणि त्यांचे शेजारी प्रशांत मुजुमदार यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक तोडून चोरी केल्याची खात्री होताच फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात जाऊन चोरीच्या घटनेची तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार चोरी झालेले साहित्य २० हजार रुपये किमतीचे असून यात चांदीचे ताट, दोन वाट्या, एक ग्लास, एक चमचा. ५ हजार रुपये किमतीचे सुट्टे पैशांची नाणी यांचा समावेश आहे. प्रशांत मुजुमदार यांचे घरात भाडेतत्वावर राहत असलेल्या संदीप जिगरा यांचे २ हजार रुपये किमतीचे चांदीचे लहान मुलांचे पैंजण असे एकूण २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.