चहाची मस्करी भोवली, दोघा भावांवर कोयत्याने सपासप वार
चहा पित असताना मस्करीतून झालेल्या वादातून दोघा भावांवर चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ बँक मार्केट परिसरात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ऋषि बर्डे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भाऊ आदित्य राजेंद्र बर्डे (वय २२, रा. घुंगरुवाली चाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सिध्देश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य आणि त्याचा भाऊ ऋषि हे दोघे केतन पांढरे आणि हर्षल खिलारे या दोन मित्रांसोबत भारती विद्यापीठ बँक मार्केट समोर चहा पित बसले होते. यावेळी आदित्यने आरोपी सिध्देश चोरघेसोबत मस्करी केली. मात्र, याच मस्करीचा राग मनात धरून सिध्देशने आपले साथीदार ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्यासोबत संगनमत करून आदित्य आणि त्याच्यासोबत वाद घातला.
यावेळी शिवीगाळ करून आदित्य आणि भाऊ ऋषिला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ऋषिवर कोयत्याने सपासप वार केले. यात ऋषिच्या डोक्यात कोयता लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आदित्यने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींवर कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०३ (२) सह आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.