व्यसनांना मिळालेली प्रतिष्ठा ठरतेय घातक
लक्ष्मण मोरे
पुणे शहरात (Pune) राजरोसपणे सुरू असलेली नशेची दुकाने आणि तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता (Addictions) ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. पूर्वी ३० वर्षाच्या आसपासचे तरुण व्यसनाधीनतेकडे झुकलेले असायचे. हे प्रमाण आता १४ ते २१ या वयोगटापर्यंत खाली आले आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम घरातील मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पॉकेटमनीच्या नावाखाली मिळणारा भरपूर पैसा मुलांना व्यसनाच्या गर्तेत ओढत चालला आहे. पालकांची बेजबाबदार वृत्ती याला कारणीभूत ठरत आहे. या निमित्ताने पालकांचेही प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गांजा, चरस, कोकेन, हेरॉइन आदी साहित्याच्या विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज तर आहेच; परंतु, जनजागृतीचीदेखील अधिक आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत व्यसनाला सामाजिक मान्यता मिळत चालली आहे. पूर्वी व्यसने वाईट समजली जायची; मात्र आता सिगारेट, दारू पिणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागले आहे. त्यामुळे ही व्यसने करताना मुले कधी ड्रग्जच्या आहारी जातात हे लक्षातही येत नाही. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये भरती होणाऱ्यांमध्ये ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अल्पवयात तंबाखूजन्य, निकोटिनयुक्त पदार्थांच्या आहारी गेलेली मुले पुढे मोठी व्यसने करायला लागतात. आनंद व्यक्त करण्यासाठी 'एन्जॉयमेंट' च्या नावाखाली मित्रांसोबत व्यसन केले जाते. व्यसन करून मनावरील ताण-तणाव कमी होतो, हा मोठा गैरसमज तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. तरुणांमध्ये व्यसनाला प्रतिष्ठा येऊ लागली आहे. अल्पवयापासून लागणारी व्यसनांची कीड शरीरावर दुष्परिणाम तर करतेच आहे; परंतु मानसिक नैराश्याच्या भोवऱ्यात ही मुले अडकत चालली आहेत. या सर्वांचा परिणाम कौटुंबिक वातावरण अशांत करण्यावर होत असून, कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक परिणाम भोगावे लागत आहेत. पराकोटीच्या व्यसनाधीनतेमधून गुन्हेगारीला खतपाणी मिळू लागले असून, हा सामाजिक प्रश्न बनला आहे. केवळ पोलीस ही जबाबदारी पाडू शकतील, अशी स्थिती आता राहिलेली नाही. पालक, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्थांचीही जबाबदारी वाढलेली आहे. सामूहिक जबाबदारीमधून अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाला कमी करता येऊ शकेल.
व्यसन करण्यासाठी विविध ड्रग्जचा वापर करण्यात येतो. हे ड्रग्ज घेतल्यानंतर ते एका ठराविक काळापर्यंत संबंधित व्यक्तीच्या शरीरात राहते. न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या अनुभवानुसार, ड्रग्जचा तीव्रतेनुसार अंश व्यक्तीच्या रक्तात दीर्घकाळापर्यंत राहू शकतो. त्या काळात त्या व्यक्तीच्या रक्ताची, लघवीची तपासणी केली की ते कळू शकते. शहरात सहजासहजी मिळणारा गांजा, चरस यापासून ब्राऊन शुगर, अफू, कोकेन, एलएसडी, एमडीपर्यंतच्या पदार्थांची उपलब्धता वाढली आहे. गांजा, चरस यासारखे ड्रग्ज घेतल्यानंतर त्यांचा अंश सुमारे १० तासांपर्यंत शरीरात राहतो, तर अफू आणि ब्राऊन शुगरचा अंश सुमारे १२ तास राहतो. कोकेनचा अंश ६ तास राहतो, एलएसडी या ड्रग्जचा अंश २४ तासांपर्यंत राहू शकतो.
‘धुवाॅं’ त हरवतेय पुण्याची तरुणाई
तरुणांमध्ये हुक्क्याची धूम्रवलये सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेले हुक्का पार्लर्स पालकांची डोकेदुखी ठरत आहेत. सध्या पुण्याची अवस्था ‘धुवाॅं’ मे उडता पुणे अशी झालेली आहे. तरुणांची पावले व्यायामशाळांऐवजी हुक्का पार्लर्सच्या दिशेने वळू लागली आहेत. राजरोसपणे सुरू असलेली ही नशेची दुकाने फोफावू लागली आहेत. हुक्का पार्लरला कायदेशीर परवानगी दिली जात नाही. अलीकडच्या काळात तंबाखू आणि ड्रग्जचे मिश्रण दिले जात आहे. त्यामध्ये कोकेन आणि एमडीचे प्रमाण अधिक आहे. हुक्क्याला तरुणांमध्ये पसंती मिळत आहे. त्यामुळे एखाद्या आइस्क्रीम पार्लरसारख्या फ्लेवर्सची मांदियाळीच शौकिनांसाठी उपलब्ध होत आहे. तंबाखू सेवनासाठी हुक्क्याचा आधार घेतला जातो. व्यसनाला ‘चव’ देवून त्याचा खप वाढविण्याचा हा प्रकार आहे. त्याची 'क्रेझ' वाढल्याने तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मोसंबी, संत्रा, आंबा, व्हॅनिला असे दोन-चार नव्हे तर तब्बल ५२ फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रीमियम फ्लेवर्सचे ११, तर इकाॅनॉमी फ्लेवर्सचे तब्बल ४१ फ्लेवर्स बाजारात सध्या उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रीमियम फ्लेवर्समध्ये ब्लूबेरी, बॉम्बे पानमसाला, डबल अॅपल, मिन्ट, ओशन मिक्स, संत्रा, पान रास, सिल्व्हर फॉक्स, स्ट्रॉबेरी असे विविध स्वाद आहेत, तर इकाॅनॉमी फ्लेवर्समध्ये चॉकलेट, चोको मिन्ट, नारळ, कॉफी, बबलगम, बनाना, कोला, मँगो, पेरू, द्राक्ष, अननस, पुदिना, गुलाब, व्हॅनिला, कलिंगड, कैरी, लिची, मध आदी ४१ फ्लेवर्सचा समावेश आहे.
अमली पदार्थ बाळगल्यास किती होऊ शकते शिक्षा? (Drugs)
किती प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, त्यानुसार आरोपींना शिक्षा होते. कायद्यानुसार, अगदी किरकोळ प्रमाण असेल तर ६ महिन्यांपेक्षा जास्त सक्तमजुरी किंवा १० हजार रुपये दंड, व्यावसायिक प्रमाण असेल तर १० वर्षे सक्तमजुरी किंवा १ लाख दंड किंवा दोन्ही तर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रमाण असेल तर १० वर्षांपेक्षा जास्त आणि २० वर्षांपेक्षा कमी किंवा १ लाखापेक्षा जास्त मात्र २ लाखापेक्षा कमी दंडाची तरतूद आहे. अमली पदार्थांविरोधात स्थानिक पोलीस ठाणी, गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकांकडून कारवाई केली जाते. याशिवाय केंद्रीय सीमा शुल्क विभागही कारवाई करीत असते. असे असले तरी सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा होईल, इतका भक्कम पुरावा मिळतोच, असे नाही किंवा गोळा केला जातो, असेही नाही. त्यामुळे न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.
मागील काही दिवसात तरुणांमध्ये विशेषत: १७ ते २५ या वयोगटामध्ये अमली पदार्थांचे अधिक आकर्षण आहे. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील तरुणांचा समावेश आहे. गांजा आणि मेफेड्रोन याच्या आहारी तरुण जात असल्याचे म्हणता येईल. आमच्या संस्थेत दर महिन्याला साधारण १५० लोक उपचारांसाठी दाखल होतात. यातील २० ते २५ टक्के लोक हे ड्रग्जच्या आहारी गेलेले असतात, तर उर्वरित ८० टक्के अल्कोहोलिक असतात. ड्रग्जचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आम्ही त्यावर समुपदेशन आणि सुधारणा याविषयी काम करीत आहोत.
- डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
अलीकडच्या काळात बिनवासाची व्यसने करण्याचे प्रमाण वाढले आहे. महागडे व्यसन असले की आपल्याला प्रतिष्ठा मिळेल, असे अनेकांना वाटते. या आभासी जगात तरुणाई ओढली जात आहे. मुलींमधील ड्रग्जचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक आहे. पालकांचीदेखील जबाबदारी वाढली आहे. त्यांनीही अधिक जागरूक आणि जागृत राहावे. 'पब' आणि 'हेवी पार्टी' मध्ये अमली पदार्थांचा अधिक वापर केला जातो. याबाबत उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. किशोरवयीन मुलांना पालक जेव्हा घेऊन येतात तेव्हा त्यांची अवस्था पाहवत नाही. याविषयी दूरदृष्टी ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. अजय दुधाणे,
संचालक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र
ड्रग्जचे दुष्परिणाम
भूक कमी होत जाते
शरीराचे तापमान वाढते, घाम सुटतो
ताणलेले जबडे, दात कराकरा चावण्याची सवय, ताठर मान, स्नायूंवर ताण येणे
रक्तदाब वाढणे, छातीत दुखणे
डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणे, डोळ्यांची आपोआप होणारी हालचाल
नाकातून तोंडात द्रवणे
निद्रानाश, मानसिक आजार, चिंतातूर राहणे, अस्वस्थतेची भावना
शरीर थरथरणे, चित्त सतत विचलित असणे
अमली पदार्थ आणि त्याचा राहणारा अंमल
गांजा १० तास
चरस १० तास
ब्राऊन शुगर १२ तास
अफू १२ तास
कोकेन ६ तास
एलएसडी २४ तास