Vajpayee College Dean
महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टअंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एमबीबीएस प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी पुणे महापालिकेने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यात डीन दोषी आढळल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाच्या डीनलाच लाच घेताना पडल्याने महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात तसेच संपूर्ण वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. महापालिकेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ८ ऑगस्ट रोजी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये पुणे महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांचा समावेश आहे. या समितीने अहवाल सादर करण्याची मुदत मागितली होती. मात्र, अखेर समितीने अंतिम चौकशी अहवाल आयुक्त विक्रम कुमार यांना सादर केला आहे, या अहवालानुसार ते दोषी आढळले आहेत. त्यावर पालिकेचे आयुक्त कुमार यांनी येत्या ३ दिवसांत कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.
शहरातील नागरिकांना अल्प दरात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे वैद्यकीय संचालित करण्यासाठी शिक्षण ट्रस्ट स्थापन केली आहे. त्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधीपक्षनेते , सर्व पक्षांचे नेते , आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख, महाविघालयाचा अधिष्ठाता, शहर अभियंता, विधी सल्लागार यांचा समावेश आहे, पण महापालिकेचे सभागृहच अस्तित्वात नाही. त्यामूळे या ट्रस्टवर सध्या पदाधिकारी नसुन केवळ प्रशासकीय अधिकारी आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे या महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.