संग्रहित छायाचित्र
‘लिक्विड लेझर लाउंज’ (एल-३) बारमधील पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी अटकेतील आरोपी आणि पार्टीतील काही ग्राहकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच घटनास्थळावरील नमुनेही घेण्यात आले असून, अन्य ग्राहकांची चौकशी केली जात आहे. आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यात ड्रग्जचे अंश सापडल्यास अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात आठही आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
‘एल-३’ बारच्या जागेचा मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. साईप्रसार अपार्टमेंट, मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, भूगाव), रवी माहेश्वरी (रा. मॅजेस्ट्रिक, उंड्री) हे बारचालक, पार्टीचा आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डिजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), पार्टीच्या आयोजनात सहभागी झालेले रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस पस्कूल मल्लिक (वय ३३, रा. जयजवान नगर, येरवडा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता आणि सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादन कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, ‘एनडीपीएस’ गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात येत आहेत. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यास ‘एनडीपीएस’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची माहिती देण्यास टाळाटाळ
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयात सोमवारी सर्व आरोपींना हजर करण्यात आले. या बारमध्ये ग्राहकांना कोणता अंमली पदार्थ देण्यात आला, याची माहिती आरोपींनी दिलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याचा साठा सापडला असून, आरोपींकडे इतर ठिकाणीही मद्याचा साठा असण्याची शक्यता आहे. या पार्टीत अल्पवयीन मुलांनाही प्रवेश देऊन अंमली पदार्थ व मद्य देण्यात आल्याचे समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ झालेल्या ‘व्हिडिओ’त दिसत आहे. या मुलांसह पार्टीत सहभागी ग्राहकांची माहिती आरोपींकडून घ्यायची आहे, तसेच पार्टीत अंमली पदार्थ व बेकायदा मद्याचा पुरवठा कोणी केला, या पार्टीच्या आयोजनात कोणाचा वरदहस्त आहे, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर आणि तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी केली. आरोपींच्या वतीने अॅड. मनीष पाडेकर, अॅड. राजेश कातोरे, अॅड. जी. एन. अहिवळे, अॅड. तौसिफ शेख, अॅड. विक्रम नेवसे यांनी बाजू मांडली.