आर्मीच्या वर्कशॉप मधून चोरी केलेली विदेशी पिस्तूल आणि ८० काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

एका अल्पवयीन मुलाने खडकी येथील आर्मी ५१२ बेस वर्कशॉप मधील वसाहती मध्ये घरफोडी करून विदेशी पिस्तूल आणि ८० काडतुसे चोरली. ही पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राला दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 10 Oct 2024
  • 06:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एका अल्पवयीन मुलाने खडकी येथील आर्मी ५१२ बेस वर्कशॉप मधील वसाहती मध्ये घरफोडी करून विदेशी पिस्तूल आणि ८० काडतुसे चोरली. ही पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्राला दिली. पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या  तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या "मालमत्ता विरोधी पथकाने" अटक केली. ही कारवाई बुधवारी (९ बुधवारी) दापोडी येथील पवना नदीच्या काठावर करण्यात आली. 

चेतन राजू वानखेडे (वय १९, रा. खडकी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक दापोडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुमित देवकर, गणेश सावंत आणि हर्षद कदम यांना माहिती मिळाली की, दापोडी येथील पवना नदीच्या काठावर एक व्यक्ती शस्त्र विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चेतन वानखेडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि ८० जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे कुठून आणली याबाबत तपास केला असता चेतन याने याबाबत माहिती दिली.

चेतन याच्या अल्पवयीन साथीदाराने खडकी येथील आर्मी ५१२ बेस वर्कशॉप मधील वसाहतीमध्ये घरपोडी केली. त्यामध्ये त्याने विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे चोरी केली होती. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात सन २०२३ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने चोरी केलेली पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या चेतन याला अटक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार आशिष बनकर, गणेश सावंत, सुमित देवकर, हर्षद कदम, सोमनाथ मोरे यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest