संग्रहित छायाचित्र
रोहित आठवले
गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांचे पाय बांधून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार (crime news) करणाऱ्या विकृतास चिखली पोलिसांनी (Chikhali police) अटक केली आहे. गोठा मालकाने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
रामकिशन श्रीरामभवन चौहाण (वय २४, सध्या रा. जाधववाडी, चिखली मूळगाव राणीपूर, महाराजगंज, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या विकृताचे नाव आहे. याप्रकरणी गोठा मालकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोठा मालकाकडे काही जनावरे आहेत. रात्री गोठ्यात जनावरे मोकळी सोडून मालक घरी जात होता. मात्र, मागील दीड महिन्यांपासून सकाळी गोठ्यात आल्यावर दीड वर्षांचे एका जनावराचे पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून येत होते. तसेच तेथील परिस्थिती पाहिल्यावर तेथे अनुचित प्रकार घडला असल्याची शंका गोठा मालकाला येत होती.
सुरुवातीला गोठा मालकाने जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून जनावरावर उपचार केले होते. पण हा प्रकार काय आणि कसा घडत होता याबाबत माहिती मिळत नव्हती. १८ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत तीन वेळा हा प्रकार घडला होता. अखेर गोठा मालकाने गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तेव्हा ३ ऑगस्टच्या पहाटे गोठ्यातील लाईट बंद असल्याचे मालकाला त्याच्या नातेवाइकांनी कळविले.
त्यामुळे गोठा मालकांनी जाऊन पाहणी केली असता, आतून कडी लावली असल्याचे लक्षात आले. तर पत्रा उचकटून कोणी तरी निघून गेल्याचे लक्षात आले. तसेच गोठ्यातील सीसीटीव्ही कॅमेरा उचकटून काढल्याचेही समजले. त्यामुळे गोठ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग ज्या मोबाईलमध्ये चित्रित होत होते, त्याची पाहणी करण्यात आली. तेव्हा एक युवक गोठ्यात आल्यावर जनावराला काठीने बेदम मारहाण करून, त्याचे पाय बांधत होता. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्याचबरोबर अत्याचार करणाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरे उचकटून नेल्याचेही चित्रित झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी गोठा मालकाने नातेवाइकांसह परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा मजुर राहणाऱ्या एका इमारतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला युवक जाताना दिसला. त्यामुळे या कुटुंबाने पोलिसांना पाचारण करून, त्या इमारतीत शोध घेतल्यावर चौहाण आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यावर, चौहाण याने अशाच प्रकारे अन्य काही गोठ्यांमध्ये जाऊन जनावरांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांसमोर दिली आहे. चिखली पोलिसांनी चौहाण याला अटक केली असून, भारतीय दंड विधान संहिता ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौहाण याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने जाधववाडी अथवा चिखली-कुदळवाडी भागातील कोणत्या गोठ्यात अशा प्रकारे घृणास्पद कृत्य केले आहे याचा उलगडा होणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.