पुणे : आर्मी इंटेलिजन्सच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याबाबतचे सांगून आर्मीच्या सिकंदराबाद येथील युनिटमध्ये भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वानवडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आर्मी मध्ये नोकरी लागल्याचे बनावट अपॉईंटमेंट लेटर चौघांना १२ लाख ८० हजारांना गंडविण्यात आले. त्याच्याकडून आर्मीचे बनावट ओळखपत्र व अन्य बनावट कार्ड जप्त करण्यात आली आहेत.
रणजीत कुमार राजेंद्र सिंग (रा. कोईमत्तूर, तामिळनाडू) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी धोंडीबा राघू मोटे (वय २१, रा. मोटेवडी, जत, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२३ ते अद्याप रेस कोर्स वानवडी पुणे येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटे आणि त्यांचे मित्र नामे सचिन कोळेकर (रा. कंटी, सांगली), माळाप्पा पांढरे, सागर मोटे हे सर्वजण रेस कोर्स वानवडी पुणे येथे आर्मी भरतीचा सराव करित होते. आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग याने या मुलांना भेटून आर्मी इंटेलिजन्समध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याबाबत बतावणी केली. त्यांना सिकंदराबाद येथे भरती करतो असे सांगून आर्मी मध्ये नोकरी लागल्याची बनावट अपॉइंटमेंट लेटर दिले. त्याने या तरुणांना त्याचे स्वतःचे आर्मीचे बनावट आय कार्ड व इतर कार्ड दाखविली.
त्यांचा विश्वास संपादन करून चौघाकडून वेळोवेळी एकूण १२ लाख ८० हजार रोख व ऑनलाइन स्वरूपात घेऊन आर्थिक फसवणूक केली. तसेच, परमेश्वर महादेव घोडके (रा. जेवळी उस्मानाबाद), दत्ता चंद्रकांत म्हेत्रे (रा.देवणी, लातुर), अभिजीत सूर्यकांत तांबे (रा.मयूर पार्क, हांडेवाडी), सचिन वसंत पवार (रा. रहमतपुर, सातारा), आदित्य संजय पवार, प्रतीक प्रवीण पवार, सुरज सुनील मोरे (रा. मोरेवाडी, सातारा), चेतन हनुमंता चव्हाण (रा. आरळे, सातारा), अभय श्रीरंग नलावडे (रा. पानपेळवाडी, सातारा), गणेश क्षीरसार (रा. तुळजापूर, उस्मानाबाद), निलेश दयाप्पा नाईक (रा. धाटी, कोल्हापूर), प्रमोद दशरथ गावडे (रा. हल्लारवाडी, कोल्हापूर), तौसीफ शेख (ता तुळजापूर) यांच्याकडून आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत. या तरुणांची देखील मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.