जन्मठेपेच्या कैद्याने घातला कारागृह प्रशासनाला २६ लाखांचा गंडा
पुणे : येरवडा कारागृहामध्ये बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने बनावट सह्या करीत २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांचा अपहार केला. कैद्याना त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या 'मनी ऑर्डर'ची रक्कम खोटे हिशोब तयार करून त्याने लाटली आहे. मनी ऑर्डर आलेली नसतानाही त्याने तशा नोंदी करून रकमा लंपास केल्या.कारागृह प्रशासनाची फसवणूक केल्याचा हा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार फेब्रुवारी २०२१ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये घडला.
सचिन रघुनाथ फुलसुंदर (मूळ रा. मोकास बाग, जुन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी बापूराव भीमराव मोटे (वय ३८, रा. शासकीय निवासस्थान, कारागृह परिसर येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन फुलसुंदर याच्यावर २००६ साली नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. २००६ पासून तो कारागृहामध्येच शिक्षा भोगत आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला २१ मे २००९ रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
तेव्हापासून फुलसुंदर येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला सध्या सर्कल तीन मध्ये असलेल्या बराक क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. कारागृह प्रशासनाने त्याला कारखाना विभागामध्ये काम दिलेले होते. या ठिकाणी तो साफसफाईची कामे करीत होता. न्याय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सतत कामात व्यग्र असतात. या सर्वांची नजर चुकवून त्याने कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर पाठविण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने संबंधित विभागात प्रवेश करायला सुरुवात केली. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला.
त्याला या विभागात मनी ऑर्डर रजिस्टर आढळून आले. याठिकाणी कैद्यांच्या नातेवाईकांकडून येणाऱ्या मनी ऑर्डरची रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. त्याचे हिशोब ठेवले जातात. या रजिस्टरमध्ये त्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून फेरफार करण्यास सुरुवात केली. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या खाजगी मनीऑर्डरचे रजिस्टर तो नजर चुकवून हाताळत होता. अधिकाऱ्यांच्या हुबेहूब बनावट सह्या त्याने करायला सुरुवात केली आणि रकमेच्या नोंदी बदलून त्यातून उरलेल्या पैशांचा अपहार करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे कैद्यांच्या नावाने रकमा आलेल्या नसतानाही स्वतःच्या आणि अन्य कैद्यांच्या नावाने नोंदी करून तो रक्कम काढून घेऊ लागला. मागील अडीच वर्षांपासून तो हे उपद्व्याप करीत होता.
याच कालावधीमध्ये मनी ऑर्डर रजिस्टरमध्ये नोंद होणाऱ्या रकमांच्या नोंदीमध्ये काहीतरी घोळ असल्याची कुणकुण अधिकाऱ्यांना लागली होती. त्यानुसार कारागृह प्रशासनाने त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. एका रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये हुबेहूब मनी ऑर्डर रजिस्टरच्या खोट्या नोंदी तसेच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि विविध रक्कम टाकून पैसे लंपास करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मागील अडीच वर्षातील सर्व रजिस्टर वह्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ या सर्व कालावधीत त्याने शेकडो कैद्यांच्या नावाने आलेल्या मनी ऑर्डर मधील २६ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैशातून त्याने कारागृह कँटीनमधून खरेदी केली आहे. तसेच हे पैसे घरी पाठविले आहेत का? अन्य कैद्यांना खर्चाकरिता दिले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहेत
बलात्कार आणि खुनाचा प्रयत्नाच्या २००६ साली दाखल असलेल्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मनी ऑर्डर रजिस्टरमध्ये असलेल्या नोंदी बदलल्या. अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून रकमा काढल्या. त्यामधून कँटीनमध्ये खरेदी केली. मनी ऑर्डर विभागाकडील रक्कम कमी होत चालल्याने याबाबत संशय बळावला. त्याच्यावर लक्ष ठेवून हा प्रकार उघडकीस आणण्यात आला. कैद्यांच्या नावाने मनी ऑर्डर आलेल्या नसतानाही पैसे आल्याच्या नोंदी त्याने केल्या होत्या. पोकळ रकमा दाखवत त्याने फसवणूक केली.
- अशोक काटे, पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी