Pune Crime News : छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर बलात्कार, अलंकार पोलिसांकडून आरोपींना अटक

नियतीने आई आणि वडील दोन्हीही हिरावून घेतलेली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आपल्यासोबत होत असलेल्या छेडछाडीची तक्रार द्यायला गेल्यानंतर ज्याच्याकडे तक्रार करायची त्यानेच तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केला.

Pune Crime News : छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर बलात्कार, अलंकार पोलिसांकडून आरोपींना अटक

संग्रहित छायाचित्र

पुणे : नियतीने आई आणि वडील दोन्हीही हिरावून घेतलेली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आपल्यासोबत होत असलेल्या छेडछाडीची तक्रार द्यायला गेल्यानंतर ज्याच्याकडे तक्रार करायची त्यानेच तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार केला. ही घटना कोथरूड येथील गोसावी वस्ती येथे १२ ऑक्टोबर आणि १८ नोव्हेंबर रोजी घडला. ही घटना उजेडात येताच अलंकार पोलिसांनी आरोपी भावांना तात्काळ अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने १ डिसेंबरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

किशोर परमेश्वर केदार (वय २३), नकुल परमेश्वर केदार (वय २१, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. आरोपी भाऊ कोणताही कामधंदा करीत नाहीत.  पिडीत मुलीचे आणि आरोपीचे कुटुंबीय ओळखीचे आहेत. पिडीत मुलीची आई अनेक वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेली आहे. तर, तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तिचे आजोबा तिचा सांभाळ करतात. आजोबा मिळेल ते काम करून कुटुंबाचा निर्वाह करतात. ही मुलगी नववीमध्ये शिकण्यास आहे. ती शिकवणीसाठी (क्लास) जात असताना आरोपी नकूल हा तिची वारंवार छेड काढत होता. तिचा पाठलाग देखील करीत होता.

यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ही मुलगी त्याचा मोठा भाऊ असलेल्या किशोर केदार याच्याकडे गेली. त्यावेळी त्याने तिला तक्रारीचे कारण विचारले. तिने घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर चिडलेल्या किशोरने तिला ओढतच घरामध्ये नेले. तिच्यावर जबरदस्ती करीत तोंडावर रुमालाचा बोळा दाबला. तिच्यावर त्याने बलात्कार केला. यावेळी त्याने, 'माझ्या भावाची तक्रार करतेस काय? तुला राहायचे आहे का नाही? इथून पुढे मी ज्या ज्या वेळी तुला बोलावीन त्या त्या वेळी यायचे. नाही आलीस तर तुझे काय करायचे ते बघतो' अशी धमकी दिली. तिने नकार दिल्यानंतर, त्याने 'तुम्हा मांगा-महरांची लायकी आहे का? तुम्ही कोणीच माझे काहीही वाकडे करू शकत नाही.' अशी धमकी दिली.

याबाबत पिडीत मुलीने घाबरून कोणाकडेही वाच्यता केलेली नव्हती. दरम्यान, तिच्या आत्याची मुलगी घरी आलेली होती. तिला या मुलीने आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली. आत्याच्या मुलीने हा सर्व प्रकार आजोबाला सांगितला. त्यानंतर, आजोबा व पिडीत मुलगी तसेच अन्य नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की पिडीत मुलगी अल्पवयीन आहे. तिची छेडछाड केली जात होती. ती तक्रार द्यायला गेल्यानंतर बलात्काराचा प्रकार घडला. तिच्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest