बड्या उद्योजकाला कारचालकांनी घातला २९ लाख रुपयांचा गंडा

शहरातील एका बड्या उद्योगपतीला त्यांच्याच कारचालकांनी बाणेर येथील पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सुमारे २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 9 Sep 2023
  • 05:13 pm
Pune Crime News

बड्या उद्योजकाला कारचालकांनी घातला २९ लाख रुपयांचा गंडा

पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डमधून लांबवली रक्कम, पंपावरील व्यवस्थापकही सामील

शहरातील एका बड्या उद्योगपतीला त्यांच्याच कारचालकांनी बाणेर येथील पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सुमारे २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लागणारे इलेक्ट्रिक पार्ट तयार करणाऱ्या स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा किशोरीलाल रामरायका यांना त्यांच्याच कारचालकांनी तब्बल २८ लाख ८४ हजार रुपयांना ठगवल्याचे समोर आले आहे. रामरायका यांच्या वापरातील मोटारींमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्याच्या बहाण्याने बिलापेक्षा अधिक रकमा उकळण्यात आल्या. या फसवणुकीमध्ये त्यांनी पेट्रोल पंपावरील कामगार, व्यवस्थापक सहभागी करून घेतल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार ऑफिसच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमधून उघडकीस आला. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र सागूनचंद भवर (रा. वडगाव शेरी), नितीन गोरख खरात (रा. जयप्रकाश नगर, येरवडा) या चालकांसह माउली पेट्रोल पंप येथे काम करणारा प्रकाश नावाचा कामगार आणि पंपाचा व्यवस्थापक यांच्यावर विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कपील सुभाष पाटील (वय ४४, रा. बेव्हर्ली हिल्स, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील हे रामरायका यांच्या कंपनीमध्ये अधिकारी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरीलाल रामरायका यांची स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय चिंचवड येथे आहे, तर चाकण, तरवडेसह व्हिएतनाम या देशामध्ये प्लांट आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लागणारे फ्लॅशर, सेन्सर, रेग्युलेटर अँड रेक्टीफायर, सीडीआय, यूएसबी चार्जर, कॅपेसिटर, हेड लॅम्प, कंट्रोलर, मोटर, कंट्रोल युनिट, स्पीडोमीटर, बॅटरी चार्जर युनिट, इग्निशन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आदी प्रॉडक्ट तयार केले जातात.

रामरायका यांच्याकडे राजेंद्र भवर आणि नितीन खरात हे दोघे कारचालक म्हणून काम करतात. त्यांच्या गाड्यांमध्ये हेच दोघे पेट्रोल-डिझेल भरतात. या वाहनांमध्ये बाणेर रस्त्यावरील माउली पेट्रोल पंपावर इंधन भरले जाते. रामरायका यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या 'अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनियम' या क्रेडिट कार्डवरून त्यांचे पैसे दिले जात होते. भवर आणि खरात या दोघांनी जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मदतीने आर्थिक अफरातफर केली.

पेट्रोल भरण्यासाठी वाहने पेट्रोल पंपावर नेल्यानंतर त्यामध्ये जेवढ्या रकमेचे पेट्रोल भरले जायचे त्याची रक्कम 'अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनियम' च्या क्रेडिट कार्डवरून दिली जात होती. मात्र, इंधन भरल्यानंतर इंधनाच्या मूळ रकमेपेक्षा अधिक रक्कम कापली जायची. इंधनाचे बिल वजा करून राहिलेली रक्कम भवर आणि खरात पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोख स्वरूपात परत घेत असत. यामध्ये पंपावरील व्यवस्थापक सहभागी असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

असा झाला गुन्हा उघड

पेट्रोल-डिझेल भरल्यानंतर भवर आणि खरात जेवढ्याचे इंधन भरले आहे तेवढ्याचेच बिल घेत असत. कोणत्याही खर्चाचे बिल ऑफिसच्या व्हाट्सॲप ग्रुपवर टाकण्याचा नियम आहे. त्यानुसार त्यांनीही ही बिले ग्रुपवर टाकलेली होती. मागील सहा महिन्यात इंधनावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होत असल्याचे क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटवरून लक्षात आले. रामरायका यांच्या अकाऊंटंटने जानेवारी ते जून या सहा महिन्यातील बिलांची गोळाबेरीज मांडली. तेव्हा भवर आणि खरात यांनी रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्योजक किशोरीलाल रामरायका यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र भवर आणि नितीन खरात या दोघांनी वाहनांमध्ये इंधन भरण्याच्या बहाण्याने अधिकची रक्कम काढून २८ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद प्राप्त झाली आहे. यामध्ये पेट्रोल पंपावरील कामगार, व्यवस्थापक यांनी त्यांना साथ दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पेट्रोल पंपावरील कामगारांना यामागे कमिशन मिळत होते का, याचादेखील तपास सुरू आहे.

- रुपेश चाळके, पोलीस उपनिरीक्षक, चतु:श्रुंगी ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest