मोबाईल शॉपी फोडून तब्बल ५२ लाखाची चोरी
नितीन गांगर्डे
डहाणूकर कॉलनीतील स्मार्ट कॅफे नावाच्या मोबाईल शॉपीमधून ५१ लाखांचे २०० मोबाईल आणि १ लाख ६३ हजार ८०० ची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तीन चोरट्यांनी रात्रीत दुकानाचे शटर तोडून ही चोरी केली असून दुकानाचे मालक गौरव सुरेश शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी शिंदे (वय ३१, धंदा- मोबाईल शॉपी, रा. नादब्रम्ह कॉलनी, वारजे) यांची स्मार्ट कॅफे ही मोबाईल शॉपी कलाकृती हौसिंग सोसा. डहाणूकर कॉलनी, कर्वे रोड येथे आहे. तसेच त्यांची विघ्नहर्ता मोबाईल शॉपीही आहे. या दोन्ही मोबाईल शॉपीचे व्यवहार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ सागर आणि अमित असे तिघे मिळून पाहतात. दिवसभरातील व्यवहाराचा हिशोब मॅनेजर पंकज ओव्हाळ करतात. ती रक्कम दुकानात ठेवून दोन ते तीन दिवसांनी ते घरी घेऊन जातात. दुकान सकाळी १० वाजता अमित उघडतो. मॅनेजर पंकज ओव्हाळ हा रात्री साडेदहा वाजता दुकान बंद करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे पंकजने पैसे ड्रावरमध्ये ठेवून दुकान बंद केले होते.
रविवारी गौरव यांना परिचयातील व्यक्तीने तुमच्या शॉपीचे दुकान फोडले आहे, तुम्ही लवकर या, असा निरोप दिला. अमितने मोबाईलवर दुकानातील कॅमेरे तपासले. त्यावेळी तीन अनोळखी चोर कारमधून दुकानाजवळ आले. त्यातील दोघांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतरचा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. ड्रावरमधील पैसे आणि कॅरीबॅगमध्ये मोबाईल भरून चोर निघून गेले.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तिघे भाऊ शॉपीजवळ आले असता शटर उचकटलेले आढळले. त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून कळवले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी विविध कंपन्यांचे विक्रीस ठेवलेले ५१ लाख ४९ हजार ४९२ रुपयांचे २०० मोबाईल आणि काऊंटरमधील रोख रक्कम १ लाख ६३ हजार ८०० रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर गौरव शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करत आहेत.