पुणे : बांधकाम व्यावसायिकाला ४२ लाखांचा गंडा

सदनिका खरेदीच्या बहाण्याने एकाच सदनिकेवर दोन बँकांमधून गृह कर्ज काढून बांधकाम व्यावसायिकाची ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : सदनिका खरेदीच्या बहाण्याने एकाच सदनिकेवर दोन बँकांमधून गृह कर्ज काढून बांधकाम व्यावसायिकाची ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २३ मे २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान कात्रजच्या आंबेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश ऑर्किड या सोसायटीमध्ये आणि पीरामल कॅपिटल फायनान्स तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रस्ता शाखेमध्ये घडला. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात निखिल किसन डांगे (वय ३२, रा. सायली सोसायटी, बाणेर), पिरामल कॅपिटल अँड फायनान्सच्या बिबेवाडी शाखेचे अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रोड शाखेच्या अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश लक्ष्मण रासकोंडा (वय ५२, रा. शंकर महाराज सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर २८/९ या ठिकाणी १५ गुंठे जागा खरेदी केली होती. या ठिकाणी व्यंकटेश आर्किड या नावाने बांधकाम करण्यात आले होते. 

या गृह प्रकल्पामध्ये एकूण ३१ सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या गृह प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०१ हा आरोपी निखिल डांगे याने ४४ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. तसा करारनामा देखील त्यांच्यामध्ये करण्यात आला होता. आरटीजीएसद्वारे त्याने फिर्यादीला प्रथम दोन लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम रजिस्टर करारनामा झाल्यावर देतो अशी बतावणी केली. परंतु, त्याने काही दिवसानंतर फिर्यादी यांना भेटून करारनाम्यात तुमच्याकडून पहिल्या मजल्याचे ऐवजी दुसरा मजला असे नमूद झाल्यामुळे गृहकर्ज होत नसल्याची बतावणी केली. त्यामुळे हा व्यवहार पुढे सरकला नाही. 

दरम्यान, एक दिवस या सदानिकेच्या दारावर फिर्यादी यांना पिरामल कॅपिटल अँड फायनान्स कंपनीने लावलेली तसेच अर्धवट फाटलेली नोटीस चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात पिरामल कॅपिटलच्या बिबवेवाडी शाखेमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी निखिल डांगे याने ही सदनिका पिरामल कॅपिटल आणि फायनान्सच्या बिबवेवाडी शाखेमध्ये तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रोड शाखेमध्ये अशा दोन्ही ठिकाणी गहाण ठेवल्याचे समोर आले. पिरामल कॅपिटल आणि फायनान्स बँकेमधून ३५ लाख तसेच आयसीआयसीआय बँकेमधून ३७  लाख ८० हजार ५०० रुपयांचे गृह कर्ज काढलेले असल्याचे समोर आले. आरोपीने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या हिंगणे-वडगाव शाखेमध्ये साई डेव्हलपर्स या नावाने बनावट खाते उघडले होते. पिरामल आणि आयसीआयसीआय बँकेमधून घेण्यात आलेल्या कर्ज रकमा पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.  ही रक्कम स्वतःच्या फायद्या करता या खात्यातून काढून घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. मात्र, त्यांना समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. या व्यवस्थापकांनी कोणतीही शहानिशा न करता आरोपीला कर्ज मंजूर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest