बंटी-बबलीचे अब तक ४००...

बनावट मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे गृहोपयोगी वस्तू आणि अन्य किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर तब्बल ३०० ते ४०० दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका युवकाला लोहगाव येथील राहत्या घरातून अटक केली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 12 Sep 2023
  • 04:12 pm
Pune Crime News

बंटी-बबलीचे अब तक ४००...

बनावट मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे ४०० दुकानदारांना गंडा, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आरोपी पती-पत्नी अटकेत

बनावट मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशनद्वारे गृहोपयोगी वस्तू आणि अन्य किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर तब्बल ३०० ते ४०० दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका युवकाला लोहगाव येथील राहत्या घरातून अटक केली असून, या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे.  

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४०० जणांना अशाप्रकारे गंडा घालण्यात आल्यावर एका दुकानदाराने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी गणेश शंकर बोरसे (वय ३४) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात त्याची पत्नीदेखील सामील असल्याचे समोर आले आल्यानंतर तिलादेखील पोलिसांनी अटक केली.

आरोपी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड (एनईएफटी) ट्रान्सफरसाठी बनावट ॲप्लिकेशन वापरत होता. दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून स्क्रीनशॉट दाखवत असत. दुकानदारांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास आरोपी त्याचा मोबाईल नंबर दुकानदाराला देत आणि निघून जात. काही वेळाने या नंबरवर कॉल केला असता हा नंबर स्विच ऑफ दाखवत असे.

अशाप्रकारे आरोपी आणि त्याच्या पत्नीने गेल्या काही महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३०० ते ४०० दुकानदारांची फसवणूक केली होती. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एका दुकानदाराने पोलिसांत धाव घेत या संदर्भात तक्रार दिली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे वायफाय कनेक्शन शोधून काढले,  ज्याचा वापर दुकानदारांना फसवण्यासाठी मोबाईल क्रमांकासह केला गेला होता. त्या वायफाय कनेक्शनच्या आधारे अखेर आरोपींना अटक करण्यात आली.

पाणीपुरी ते कपडे खरेदी...

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बंटी-बबलीने आतापर्यंत विविध प्रकारच्या दुकानदारांना गंडा घातला आहे. यामध्ये फळ विक्रेते, पाणीपुरी, किराणा, मेडिकल, केक, मसाले, हार, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू, गिफ्ट, स्टेशनरी नर्सरी आणि कपडे विकणारे दुकानदार यांचा समावेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest