Pune Crime News : 'म्हातारचळ' पडला ३० लाखांना; 'कॉल गर्ल' पुरवणाऱ्या टोळीने उकळली ३० लाखांची खंडणी

पुणे : ज्येष्ठ नागरिकाला 'कॉल गर्ल' (call girl) पुरवून त्यांना पोलीस कारवाईची भीती दाखवत ब्लॅकमेल (Blackmail) करून ३० लाख रुपये उकळणाऱ्या बाप-लेकीच्या टोळी विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी (Market Yard Police) खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 05:10 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गंडावले

लक्ष्मण मोरे
पुणे : ज्येष्ठ नागरिकाला 'कॉल गर्ल' (call girl) पुरवून त्यांना पोलीस कारवाईची भीती दाखवत ब्लॅकमेल (Blackmail) करून ३० लाख रुपये उकळणाऱ्या बाप-लेकीच्या टोळी विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी (Market Yard Police) खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला आहे. यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिने वडिलांसोबत मिळून ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ३० लाख ३०  हजार रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. एवढे पैसे दिल्यानंतर देखील न्यायाधीशांना मॅनेज करण्यासाठी आणखी पाच लाख रुपये आणि दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

ज्योती बनसोडे उर्फ ज्योती नितीन अहिवळे उर्फ ज्योती रामचंद्र कोरडे उर्फ ज्योती संतोष पारे (रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) असे प्रमुख सूत्रधार महिलेचे नाव आहे. तिच्यासह वडील रामचंद्र बापू कोरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे राहणाऱ्या ७४ वर्षीय जेष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी भादवि कलम ४१९, ४२०, ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार ५ जुलै २०२३ ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान मार्केट यार्ड येथील सिटी प्राईड थिएटरच्या तिरंगा हॉटेलच्या गल्लीमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ नागरिक हे शासकीय नोकरीमधून बड्या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची सांपत्तीक आणि घरची परिस्थिती उत्तम आहे. ते मुले, सुना, नातवंडे आणि पत्नीसह राहतात.

जुलै २०२३ मध्ये त्यांची आणि ज्योती बनसोडे हिची भेट झाली. ज्योती बनसोडे ही सुरुवातीला केटरिंगचा व्यवसाय करीत होती. या व्यवसायासोबतच ती वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवू लागली. ओळख झाल्यानंतर तिने फिर्यादी जेष्ठ नागरिकाला 'कॉल गर्ल' पुरवते असे सांगितले. त्यानुसार तिने एका 'कॉल गर्ल'ला त्यांना भेटायला पाठवले. ही कॉल गर्ल आणि फिर्यादी जेष्ठ नागरिक एका लॉजवर गेले होते. त्यानंतर ज्योती बनसोडे हिने फिर्यादीला फोन केला. 'तुमच्या सोबत गेलेल्या कॉल गर्लला पोलिसांनी पकडले आहे. तिच्यावर मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक झालेली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली आहे. त्यामध्ये तुमचा कॉल दिसत आहे. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यामध्ये तुमचे देखील नाव टाकणार आहेत.' अशी त्यांना भीती घातली. 'पोलीस तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला अटक करतील. ते तुमचा पत्ता विचारत आहेत.' असे देखील तिने या जेष्ठ नागरिकाला सांगितले. घाबरलेल्या जेष्ठ नागरिकाने यामधून काय मार्ग काढता येईल अशी विचारणा केल्यावर तिने पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यांना मार्केट यार्ड येथील तिरंगा हॉटेलजवळ भेटायला बोलावले. त्यांच्याकडून सुरुवातीला ७० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर वेळोवेळी 'पोलिसांची कारवाई होईल, तुम्हाला अटक होईल' अशी भीती घालत पोलीस अधिकाऱ्यांना पैसे द्यायच्या नावाखाली कॅनरा बँकेच्या चेकद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये उकळले. दरम्यान, ज्योती बनसोडे हिने या ज्येष्ठ नागरिकाकडे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली. न्यायालयामध्ये न्यायाधीशांना मॅनेज करावे लागेल असे तिने त्यांना फोन करून सांगितले. पैसे दिले नाही तर तुम्हाला अटक होईल अशी बतावणी केली. जर पाच लाख रुपये दिले, तर या ज्येष्ठ नागरिकाच्या जागेवर तिचे वडील रामचंद्र कोरडे यांना न्यायालयात उभे करते असे देखील तिने सांगितले होते. हे पाच लाख रुपये आणि दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत तिने खंडणीची मागणी केली.

या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकाला मानसिक त्रास झाला. शेवटी त्यांनी स्वतःच्या मुलाला घडलेल्या सर्व प्रकाराबाबत सांगितले. मुलाने त्यांना घेऊन थेट मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये यासंबंधी फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ ज्योती बनसोडे हिचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या. तिला शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या टोळीने अशा प्रकारे अनेकांना फसवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे.

ज्योती बनसोडे हिने ७४ वर्षीय जेष्ठ नागरिकाला कॉल गर्ल पुरवण्याच्या आमिषाने फसवलेले आहे. त्यांच्याकडून ३० लाख ३० हजार रुपये उकळण्यात आलेले आहेत.  त्यांचे कोण कोण साथीदार आहेत? त्यांनी आणखी किती जणांना अशा प्रकारे फसवले आहे? याचा तपास केला जात आहे. तिने तिचे वडील रामचंद्र बाबू कोरडे यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. त्याचा 'कॅश फ्लो' कसा आहे हे देखील तपासण्यात येत आहे.

- स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मार्केट यार्ड पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest