Lalit Patil Drug Case : महिन्याला बनत होते २०० किलो ड्रग्ज

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे, पुण्याचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 13 Oct 2023
  • 11:41 am
Drugs in Pune

संग्रहित छायाचित्र

आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये, वितरण देशा बाहेरही असण्याचा संशय

अमोल अवचिते 

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी (mafia Lalit Patil drug case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील (bhushan patil) हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज (Drugs in Pune) बनवत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे, पुण्याचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende) यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे.

भूषण पाटील आपल्या नाशिक इथल्या कारखान्यात आठवड्याला ५० किलो, तर महिन्याला २०० किलो एमडी ड्रग्ज बनवायचा. या १ किलो एमडी ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. त्यानंतर त्याचे विविध भागात डिस्ट्रिब्युशन व्हायचे.  या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना बुधवारी (दि. ११) सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांचा पीसीआर दिला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती डीसीपी अमोल झेंडे यांनी दिली.  

ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, पण या ठिकाणी ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही, पण चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचे समोर आले आहे.

बंदी असताना बेधडक विक्री सुरू

राज्यात अमली पदार्थ विक्रीवर बंदी आहे. असे असताना राज्यात ड्रग्ससह सर्वच अमली पदार्थांची बेधकडक विक्री चालू आहे. ड्रग्स, गांजा यासारख्या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्ज तस्कर इंटरनेटचा वापर करतायत. पुण्यात गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशीदेखील मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी हाच विषय आहे. गेल्या १० महिन्यात पुण्यात १०३८ किलो गांजा, तर १२० किलो अफिम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकंदरीत गेल्या १० महिन्यात पुण्यात तब्बल १४ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest