Pune Crime : 'तुनवाल ई मोटर्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीची २ कोटी ३३ लाखांची फसवणूक

इलेक्ट्रिक दुचाकी बनविण्यासाठी लागणारी गाडीची फ्रेम, मोटर, कंट्रोलर, चार्जर असे सुट्टे पार्ट चीनमधून मागविल्यानंतर हे साहित्य घेऊन येणाऱ्या आर. के. कंटेनर लाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (R. K. CONTAINER LINE PRIVATE LIMITED) २ कोटी ३३ लाख ५८ हजार ६९३ रुपयांची फसवणूक

Pune Crime

'तुनवाल ई मोटर्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीची २ कोटी ३३ लाखांची फसवणूक

पुणे : इलेक्ट्रिक दुचाकी बनविण्यासाठी लागणारी गाडीची फ्रेम, मोटर, कंट्रोलर, चार्जर असे सुट्टे पार्ट चीनमधून मागविल्यानंतर हे साहित्य घेऊन येणाऱ्या आर. के. कंटेनर लाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (R. K. CONTAINER LINE PRIVATE LIMITED) २ कोटी ३३ लाख ५८ हजार ६९३ रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर. के. कंटेनर प्रा. लि. या कंपनीने मे. तुनवाल ई मोटर्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड (May TUNWAL E MOTORS INDIA PRIVATE LIMITED) या कंपनीने चीनला ऑर्डर दिलेल्या साहित्याचे बारा कंटेनर विविध करणे देत अडवून ठेवत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यापकरणी पर्वती पोलीस (Parvati Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

आर. के. कंटेनर प्रायव्हेट मिलिटेड, दिल्ली, सुनील मिश्रा, प्रमोद पांडे, सुबोध रॉय अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भादवि १२० ब, ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीरज नारायण दिघे (वय ३२, रा. अंबर ई लाईट हौसिंग सोसायटी, साई मॅजिस्टीक रोड, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नीरज हे जुलै २०२३ पासून मे. तुनवाल ई मोटर्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. या कंपनीचे कार्यालय सारसबागेजवळ असलेल्या राम आयकॉन या इमारतीमध्ये आहे. तुनवाल ई मोटर्स ही कंपनी इलेक्ट्रीक दुचाकी बनविणे, असेंबल करणे व विकणे या व्यवसायामध्ये सन २०१६  पासुन कार्यरत आहे. ईलेक्ट्रीक बाईक्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जसे की गाडीची फ्रेम, मोटर, कंट्रोलर, चार्जर असे सुट्टे पार्ट चीनमधील तायझोऊ किंगवे आयएमपी अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेड या कंपनीकडून मागवले जातात. या कंपनीच्या ईमेल आयडीवर ऑनलाईन ऑर्डर देऊन मागणी नोंदविली जाते. हे साहित्य चीनमधून भारतात आणण्याकरिता माल वाहतूक करणारी (फ्रेट फॉरवर्डर) आर. के. कंटेनर लाईन प्रायव्हेट लिमिटेड या दिल्ली येथील या एजंट कंपनीची नेमणूक केली आहे.

त्यांच्या कंपनीच्या विविध ईमेल आयडीवर तसेच त्या कंपनीमध्ये काम पाहणारे सुनिल मिश्रा, प्रमोद पांडे, सुबोध रॉय यांना फोन करुन तुनवाल कंपनीचे साहित्य असलेले कंटेनर चीनमधील कंपनीकडून तयार असल्याचे कळवले जाते. त्यानंतर आर. के. कंटेनर लाईन ही कंपनी त्यांचे शिपिंगचे काम करणाऱ्या निंगबो न्यू यान रन इलेक्ट्रिकल एप्लायसेन्स कंपनी लिमिटेड या कंपनीला कळवते. त्यानंतर निंगबो ही कंपनी हे साहित्य असलेले कंटेनर गोल्ड स्टार लाईन लिमिटेड या मुंबईच्या कंपनीच्या जहाजाद्वारे भारतात आणून न्हावा शेवा बंदरावर उतरवून घेते. तेथुन पुढे हे कंटेनर शिपींग कंपनीची जबाबदारी असलेल्या सीएफएस (कंटेनर फ्रेट स्टेशन) यांच्याकडे जात असतात. त्यावर सीमा शुल्क विभागाचे नियंत्रण असते. त्याचदरम्यान आर. के. कंटेनर लाईन ही कंपनी शिपींग कंपनीचे होणारे भाडे व लोकल चार्ज शिपींग कंपनीकडे जमा करुन कंटेनरची डिलीव्हरी ऑर्डर कलेक्ट करते.

ही डिलीव्हरी ऑर्डर व आर. के. कंटेनर कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र तूनवाल कंपनीतर्फे न्हावा शेवा येथील कस्टम हाऊस एजंट (सीएचए) म्हणून काम पाहणाऱ्या साई-तुलसी लॉजीस्टीक्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे दिले जाते. जर आर. के. कंटेनर कंपनीने डिलीव्हरी ऑर्डर व त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही तर तेथुन तूनवाल कंपनीला माल मिळत नाही. त्यामुळे हा माल भारतात येण्यापूर्वीच त्याची कागदपत्रे तूनवाल कंपनीने नियुक्त केलेल्या कस्टम हाउस एजंट (सी.एच.ए.) म्हणुन काम पाहणाऱ्या कंपनीमार्फत कस्टम विभागामध्ये जमा केली जातात. त्यांची पडताळणी झाल्यानंतर सीमा शुल्क रक्कम भरली जाते. कस्टम अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे, एनओसी, डिलिव्हरी ऑर्डर आदी दाखविली जातात. त्यानंतर  कंटेनरमधील साहित्याची तपासणी कस्टमच्या अधिका-यासमक्ष करुन घेतली जाते. कंटेनर फ्रेट स्टेशनचे शुल्क भरून हे कंटेनर बाहेर काढले जातात. त्यानंतर हा माल कंपनीकडे पाठवला जातो.

तुनवाल कंपनीने चीनमधून मागवलेल्या मालाचे कंटेनर भारतात आल्यानंतर बंदरावरील सर्व व्यवहार करण्यासाठी जुलै २०२१ मध्ये आर. के. कंटेनर कंपनीस नेमण्यात आले होते. या कंपनीसोबत तूनवाल कंपनीने २२ जुलै २०२१ पासुन २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण २४ व्यवहार पुर्ण केलेले होते.  त्यामुळे या कंपनीवर व्यवहाराबाबतचा विश्वास बसला होता. ३ डिसेंबर २०२१ रोजी आठ आणि १७ जानेवारी २०२२ रोजी ४ असे एकूण १२ कंटेनर न्हावा शेवा बंदरावर आले होते. हे कंटेनर बाहेर काढण्यासाठीची सर्व प्रकिया आर. के. कंटेनर कंपनीने करणे अपेक्षित होते. प्रत्येक कंटेनरला येणारा खर्च, वाहतुकीचे भाडे, शिपिंग लाईन शुल्क, सीएफएस शुल्क असे एकूण ४७ लाख ९ हजार ४७४ रुपये शुल्क होत होते. ही रक्कम तूनवाल कंपनीने आर. के. कंटेनर कंपनीच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा केले होते. त्याच वेळी या कंपनीची यापूर्वीची १ कोटी ६ लाख ४५ हजार २६३ रुपयांची थकबाकी देखील जमा केली होती.

परंतु, कंटेनर वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे तूनवाल कंपनीने आर. के. कंटेनर कंपनीला याबाबत वारंवार विचारणा केली. परंतु, त्यांनी १२ कंटेनर देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, तूनवाल कंपनीने ८ कंटेनरची बंदरावरील ८९ लाख ३६ हजार २४८ रुपयांची कस्टम ड्यूटी भरली. त्यांची डिलिव्हरी मिळत नसल्याने उर्वरीत चार कंटेनरची कस्टम ड्यूटी भरली नाही. त्यामुळे बंदरावरील डिटेंशन चार्जेस वाढत गेले. हे चार्जेस भरण्यासाठी आर. के. कंटेनर कंपनीने आपल्याकडे पैसे नसल्याची कारणे दिली. कंपनीचे मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध तारखांना वेळोवेळी १ कोटी ४४ लाख २२ हजार ४४५ रुपये कंपनीच्या बँक खात्यावर घेतले. तरीदेखील तूनवाल कंपनीचे १२ कंटेनर पाठविण्यात आले नाहीत. याबाबत जाब विचारला असता आर. के. कंटेनर कंपनीने आम्हालाच २३ लाख ७६ हजार २८८ रुपयांचे नुकसान झाल्याची बतावणी करीत त्याचे बील पाठविले. कंटेनर देण्याच्या बदल्यात अधिक पैसे देण्याची मागणी केली. कंपनीची फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

याबाबत पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे म्हणाले, की 'तुनवाल ई मोटर्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड'कडून फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या अनुषंगाने आवश्यक तपास सुरू करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक आणि माल न दिल्याची प्रामुख्याने तक्रार करण्यात आलेली आहे. तपासात निष्पन्न होणाऱ्या बाबी लक्षात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest