पोलिसालाच बनवले मामा!
कमी पैशात आयफोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क पोलिसाचेच १ लाख १५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या पोलीस नाईक पदावरील पोलीस कर्मचाऱ्याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज सुभाष शेडगे असे फिर्यादीचे नाव आहे. त्याआधारे आरोपी गणेश सुतार याच्यावर रविवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज शेडगे (वय ४०, रा. स्वारगेट पोलीसलाईन) हे सध्या पुणे शहर पोलीस दलात स्वारगेट वाहतूक विभागात कार्यरत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये त्यांचा मोबाईल फोन खराब झाला. त्यांना नवीन मोबाईल फोन खरेदी करायचा होता. त्यावेळी फिर्यादी शेडगे यांना मित्रांकडून माहिती मिळाली की, गणेश सुतार (रा. गल्ली क्रमांक ३५, जनता वसाहत) हा आयफोन मोबाईल कमी किमतीमध्ये देतो.
शेडगे यांनी गणेश सुतार यास फोन करूरुन आयफोन मोबाईलबाबत विचारणा करून माहिती घेतली. त्यावेळी सुतार याने ‘‘नवीन आयफोन मोबाईल बाजारभावापेक्षा कमी दराने देऊ शकतो. माझा मोबाईल मार्केटमधील डीलरशी डायरेक्ट संपर्क आहे. त्यामुळे मला स्वस्त दरात मोबाईल फोन मिळतात. मी अनेकांना असे मोबाईल फोन दिले आहेत,’’ असे शेडगे यांना सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने ‘‘आयफोन १४ प्रो २५६ जीबी हा मोबाईल फोन कमी किमतीत ९० हजार रुपयांमध्ये देतो. त्यासाठी ५० टक्के रक्कम म्हणजे ४५ हजार रुपये बुकिंगकरिता अगोदर द्यावे लागतील,’’ असे सांगितले.
त्यानंतर आरोपीने आयफोन १४ प्रो १२८ जीबी आणि आयफोन १४ प्रो २५६ जीबीच्या पॅक बॉक्सचे फोटो फिर्यादींच्या व्हॉट्सॲपवर पाठवले. हे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक ३५ येथे फिर्यादींना पैसे देण्यासाठी बोलावले. फिर्यादींनी १० एप्रिल रोजी आपल्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ४५ हजार रुपयांची रोख रक्कम गणेश सुतार याला जनता वसाहत येथे नेऊन दिली. त्यानंतर गणेश सुतार याने ४५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने ते ऑनलाईन पाठविले. तसेच गणेश सुतार याने ४ मे रोजी पुन्हा २५ हजार रुपये मागितले.
असे सुतार याने फिर्यादीकडून एकूण १ लाख १५ हजार रुपये घेतले. आठवड्यानंतरदेखील फिर्यादीने मोबाईल फोन मिळाला नसल्याने गणेश सुतार याच्याकडे फोनवरून मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने तुमच्या मोबाईलची प्रोसेस पूर्ण झाली असून तुम्हाला मोबाईल फोन मिळून जाईल, असे सांगितले. मात्र आजपर्यंत फिर्यादींना पैसे देऊनही मोबाईल मिळाला नाही. याबाबत आरोपीला विचारल्यावर त्याने वेळोवेळी वेगवेगळी कारणे देवून मोबाईल फोन देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रविवारी (दि. १०) फिर्यादींनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पर्वती पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अक्षय सरवदे यांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना या प्रकरणी गणेश तुकाराम सुतार याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.