ससूनमध्ये तरुणाला नवसंजीवनी; मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला

ससून रुग्णालयात एका तरुणाला नवजीवन मिळाले आहे. कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकून तुटलेला त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे बाजूला झाला होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया करून त्याचा हात पुन्हा यशस्वीरीत्या जोडला आहे. ससूनमधील प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया विभागात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

sassoon hospital news

मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला

रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना सर्व धोके समजावून सांगून पार पडली पुनर्रोपण शस्त्रक्रिया

ससून रुग्णालयात एका तरुणाला नवजीवन मिळाले आहे. कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकून तुटलेला त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे बाजूला झाला होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया करून त्याचा हात पुन्हा यशस्वीरीत्या जोडला आहे.

ससूनमधील प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया विभागात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बारामतीमध्ये २२ वर्षीय तरुणाचा हात कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकला होता. त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे तुटला होता. हात तुटल्यानंतर तो सहा तासांत पुन्हा जोडणे आवश्यक होते. या रुग्णाची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना मिळाली. त्यांनी तातडीने या रुग्णाला बारामतीहून पुण्यात ससूनमध्ये आणण्याची सूचना केली. ससूनमध्ये या रुग्णाला आणण्यात आले त्यावेळी हात तुटून सहा तास उलटले होते. यामुळे हाताचे पुनर्रोपण करण्यात अनेक धोके होते. कारण एखादा भाग जेवढा जास्त वेळ शरीरापासून वेगळा राहतो, तेवढा तो जोडला न जाण्याचा धोका अधिक असतो. याचबरोबर एखादा भाग उशिरा जोडला गेल्यास रक्तातील मृत पेशींमुळे संसर्ग होऊन मूत्रपिंड, यकृत अथवा इतर अवयवांना धोका निर्माण होतो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना सर्व धोके समजावून सांगून त्यांची शस्त्रक्रियेसाठी परवानगी घेण्यात आली. अखेर डॉक्टरांनी त्याच्यावर हाताच्या पुनर्रोपणाची शस्त्रक्रिया केली.

ससूनधील प्लॅस्टिक सर्जरी विभागातील डॉ. अंकुर कारंजकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. त्यात डॉ. पीयूष बामनोडकर, डॉ. आदित्य मराठे, डॉ. रणजित पाटील, डॉ. कौशिक दास, डॉ. प्रतीक पाटील आणि डॉ. सुजित क्षीरसागर यांचा समावेश होता. त्यांना डॉ. पराग सहस्रबुद्धे आणि डॉ. निखिल पानसे यांनी मार्गदर्शन केले.

डॉक्टरांनी सर्वप्रथम रुग्णाचे हात आणि तुटलेल्या भागाची हाडे धातूच्या पट्ट्यांनी जोडली. त्यानंतर धमणी, रक्तवाहिनी, चेतापेशी आणि स्नायू जोडण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुमारे सात तास चालली. यात रुग्णाला रक्ताच्या चार पिशव्या आणि प्लेटलेटच्या दोन पिशव्या देण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आता १५ दिवसांनंतर त्याचा हात व्यवस्थितरीत्या शरीराशी जोडला गेला आहे. त्याच्या हाताचे कार्य वाढावे यासाठी पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest