पीएमपीच्या छतावर तरुणांनी धरला ठेका...
पुणे शहरात गणेशोत्सवामुळे मोठ्या उत्सहाचे वातावरण आहे. दीड दिवसानंतर पुण्यात गणपती विसर्जनास सुरुवात झाली आहे. गाजत वाजत गणरायाला निरोप दिला जात आहे. त्यादरम्यान तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आहे. असेच बेभान होऊन नाचताना तरुणांनी कळस गाठला असून थेट पीएमपी बसच्या छतावर नाचून गोंधळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चा रंगली आहे. पीएमपी प्रशासनाने याप्रकारानंतर संताप व्यक्त करून थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सारजा केला जात असताना काही टवाळखोर तरुणांकडून या उत्सवाला गालबोट लावल्याचे प्रकार दिसून येत आहेत. शहरात अनेक ठिकाणी या तरुणांकडून उत्सवादरम्यान टस्टंबाजी सारखे प्रकार सर्रास सुरु आहे. उत्सव साजरा करताना कुणी रस्ता अडवणार तर कुणी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहणांवर उभे राहून नाचताना दिसत आहे.
नेमकं व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण पीएमपी बसच्या छतावर नाचत आहेत. हा व्हिडिओ गणेशोत्सवातील असून बसमध्ये प्रवाशी बसलेले असताना हा प्रकार घडला आहे. पीएमपी बस रस्त्यावरून जात असताना हे तरूण बसच्या छतावर गेले. त्यानंतर छतावर त्यांनी डांन्स केला. तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या गर्डवर लटकत त्यांनी स्टंट सुद्धा केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
पोलीस प्रशासनाचा कानाडोळा?
गणेशोत्वादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त पुणे शहरात ठेवला गेला आहे. तरी सुद्धा काही तरुणांनी पीएमपी बसच्या टपावर जाऊन नाचल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बंदोबस्त हा नावालाच आहे की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पीएमपी प्रशासनाचा कारवाईचा इशारा
गणपती मिरवणूकीमध्ये जर कोणी पीएमपी बसच्या छतावर कोणी नाचताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. बसचे नुकसान करणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच आहे. त्यामुळे जर कोणी असे कृत्य केले तर थेट गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सांगितले जाईल. - सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.