पीएमआरडीएच्या सेक्टर १२ मधील नव्या गृहप्रकल्पाबाबत नागरिकांचा सवाल
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या शिल्लक सदनिकांची सोडत काढण्यात आली. प्राधिकरणाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांची सोडत तब्बल दोन वर्षांनी काढली.
प्रत्यक्षात सेक्टर १२ या ठिकाणी साडेसहाशे घरी रिकामी आहेत. दरम्यान, या घरासाठी तब्बल साडेसहाशे कोटी खर्च झाले, तर आता दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा ७३० कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यातील सदनिकांच्या दर्जामुळे घरे विकली गेली नाहीत, तर आता पुन्हा नव्याने खर्च करून दर्जा तोच राहिल्यास घरे विकली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणी तब्बल ११.६३ हेक्टर परिसरात दुसरा टप्पा उभारण्यात येत आहे. सद्यस्थितीत याचे काम जवळपास ३० टक्के झाले आहे. पर्यावरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यासोबत प्रधानमंत्री आवास योजना या संबंधित सगळ्या मंजुरी मिळाल्या आहेत. तूर्तास, या प्रकल्पाचे काम सुरू असून, पूर्वी केलेल्या चुका टाळण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या टप्पा दिलेल्या बांधकाम व्यवसायिकांनी केलेल्या चुका आणि त्यांच्या तक्रारी कमी होत नाहीत. पर्यायाने दुसरा टप्प्याचे बांधकाम अन्य एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, सल्लागाराची नेमणूक, बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य त्याचप्रमाणे दूरदृष्टी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हा प्रकल्प चांगला होणे आवश्यक आहे. अन्यथा सेक्टर १२ येथील पहिला टप्प्याचे बांधकामामुळे अनेक नागरिक याकडेही पाठ फिरवू शकतात. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेली घरांची सोडत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आली आहे. त्यामुळे आता याला प्रतिसाद न मिळाल्यास भविष्यात होणारा प्रकल्पही अडचणीचा ठरू शकणार आहे. कारण, निकृष्ट बांधकाम म्हणून या प्रकल्पाकडे आत्तापर्यंत पाहिले जात आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्यासाठी नव्या प्रकल्पामध्ये दर्जा राखणे आवश्यक आहे.
सल्लागारपासून ते अधिकाऱ्यापर्यंत संशयाची सुई
सेक्टर १२ या प्रकल्पाला सुरुवातीपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अगदी किरकोळ किरकोळ गोष्टी न बघितल्याने येथील रहिवाशांना अनेक अडचणींना सामना जावे लागत आहे. सोलर पॅनल उभारून दीड वर्ष होऊनही हा खर्च वाया गेला आहे. खिडक्यांच्या काचा ते लिफ्टचे दरवाजे इथपर्यंत सगळे खीळखळीत झाले आहेत. परिणामी, याला संबंधित सल्लागार आणि त्याला पोचणारे प्राधिकरणातील अधिकारी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
सेक्टर १२ येथील दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाबाबत मी स्वतः लक्ष घालून त्याबाबतचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्व चुका यात दिसता कामा नयेत, असे सांगितले आहे. त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार बदलण्याचेही सूचना केली आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.