Pune News : गणेश विसर्जन हौदावरील कामगाराला विजेचा धक्का बसून दोन्ही पाय जायबंदी; महापालिकेने जबाबदारी झटकली

गणेश विसर्जन हौदावर कामास असलेल्या एका कामगाराला दुर्दैवाने विजेचा धक्का बसला आणि त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. या कामगाराला रुग्णालयात दाखल केले असून त्याची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. महापालिका आणि संबंधित विद्युत विभागाने हात वर केले असून आता कामगाराची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 22 Sep 2023
  • 01:17 pm
Pune News

गणेश विसर्जन हौदावरील कामगाराला विजेचा धक्का बसून दोन्ही पाय जायबंदी

कंत्राटी कामगाराची जबाबदारी घेणार कोण ?

अमोल अवचिते 

गणेश विसर्जन हौदावर कामास असलेल्या एका कामगाराला दुर्दैवाने विजेचा धक्का बसला आणि त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. या कामगाराला रुग्णालयात दाखल केले असून त्याची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. महापालिका(PMC) आणि संबंधित विद्युत विभागाने हात वर केले असून आता कामगाराची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

सूरज रमेश खुडे असे जखमी कामगाराचे नाव असून तो विसर्जन हौदावर दिवा लावत होता. सूरज हा पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. गणेशोत्सवानिमित्त त्याची प्रभाग क्रमांक १३ मधील हॅपी कॉलनीमधील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाच्या शेजारील गणपती विसर्जन हौदावर नेमणूक करण्यात आली होती.  खुडे याने प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. त्याने हातातील वायर वर फेकली. त्यावेळी हाय टेन्शन तारेला या वायरचा स्पर्श झाला. त्यावेळी स्पार्किंग झाले. विजेचा धक्का बसून खुडे हा ३० टक्के भाजला. तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तत्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचा विभाग नसल्याने त्याला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी केली असल्याचा दावा केला आहे. मात्र आता महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. विसर्जन घाटावर कंत्राटी कामगार नेमले आहेत. त्यांना तिथे किमान मूलभूत सुविधा मिळणे आपेक्षित आहे. केवळ नेमणूक केली आणि कामाची जबाबदारी सोपवली असे होत नाही. कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, ऊन, पाऊस आला तर  आडोशासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे कामगारांनी 'सीविक मिरर' ला सांगितले.

विसर्जन घाटावर पुरेशा प्रमाणात प्रकाश नसल्याने सूरजला विजेचा धक्का बसला. जर पालिकेने आधीच विजेची पुरेशा प्रमाणात व्यवस्था केली असती तर हा प्रसंग घडला नसता. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून याला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे या दोघांनी सूरजवर मोफत उपचार करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना ईएसआयसीचे ओळख पत्र  देण्यात येते. मात्र अनेक वेळा मागणी करून देखील ५० टक्के कामगारांना अद्याप पालिकेकडून  हे कार्ड देण्यात आलेले नाही. कंत्राटी कामगारांची जबाबदारी घेण्यास ठेकेदारांसह पालिकाही पुढे येत नाही. कंत्राटी कामगारांना महानगरपालिकेने मोफत उपचार करण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी आयुक्तांना लेखी स्वरूपात केली असल्याचे कामगार संघटनांनी सांगितले.

 

पालिकेला प्रशिक्षित कामगार ठेवता येत नाहीत का ?

हायटेन्शन वायरबाबतची माहिती महापालिकेने कामगारांना देणे अपेक्षित आहे. महापालिकेने प्रशिक्षित कामगार नेमणे आवश्यक आहे. परस्पर असे विद्युत कनेक्शन घेता येत नाही. त्यामुळे यात कामगाराची चूक आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापारेषणचे अधिकारी म्हणाले की, घडलेल्या घटनेची पाहणी केली आहे. त्या ठिकाणी अतिउच्च दाब केबल असताना कामगाराने दुसरी वायर टाकायला नको होती. यात कामगाराने स्वत: चूक केली आहे. पाहणीचा अहवाल विद्युत निरीक्षण कार्यालयाला पाठवला आहे. त्यानंतर आता पुढील कार्यवाही केली जाईल.  

महापालिकेने टेंडर प्रक्रिया राबवून गणेश विसर्जन हौदांवर विजेची व्यवस्था केली आहे. पुरेशा प्रमाणात प्रकाश असताना देखील त्या कामगाराने परस्पर वीज कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला विजेचा धक्का बसला. आता ही महावितरण विभागाची जबाबदारी आहे.

 - श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.  

कर्तव्य बजावताना कंत्राटी कामगारांना अचानक अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्यास कोणताही संबंधित कंत्राटदार जबाबदारी घेत नाही. जखमी कामगारावर मोठ्या रुग्णालयात मोफत उपचार करण्याची जबाबदारी ठेकेदाराने आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाने घ्यावी. तसेच संबंधित सेवकाच्या कुटुंबास सेवक बरा होईपर्यंत वेतन अदा करावे.

 - वैजनाथ गायकवाड, कार्यालयीन चिटणीस, महानगरपालिका कामगार युनियन.

कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. कंत्राटी कामगाराची जबाबदारी ठेकेदाराची असली तरी मुख्य जबाबदारी मुख्य नियोक्ता म्हणून महानगरपालिकेची आहे. जखमी कामगारावर मोफत उपचार करण्यात यावा. जर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात राष्ट्रीय मजूर संघाकडून आंदोलन केले जाईल.

 - सुनील शिंदे, कामगार नेते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest