मतसंग्राम 2024 : पुणे कॅन्टोन्मेंटवर सत्ता कोणाची ?

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दहाजण लढण्यास इच्छुक आहेत, तर भारतीय जनता पक्षातून दोन भावांपैकी कोण एवढाच प्रश्न आहे.

मतसंग्राम 2024 : पुणे कॅन्टोन्मेंटवर सत्ता कोणाची ?

या निवडणुकीतही मतदारसंघातील काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दहाजण लढण्यास इच्छुक आहेत, तर भारतीय जनता पक्षातून दोन भावांपैकी कोण एवढाच प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला या मतदारसंघातून मिळालेल्या मतदानावरून हा मतदारसंघ कॉंग्रेसला पोषक असल्याचे बोलले जात आहे. मात्र नेहमीप्रमाणे कॉंग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी अशीच सुरू राहिली तर त्याचा फायदा होत भाजपच आगामी विधानसभेला बाजी मारेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  (Matsangram 2024)

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील २८८ जागांवरील इच्छुकांचे अर्ज मागवले होते. पुणे शहरामधील सात विधानसभा मतदारसंघात तब्बल २४ जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभेला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधून विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे.  तब्बल १० जण या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र असे असले तरी कॉंग्रेसमधून तीन प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तिघांमध्ये निवडणुकीसाठी रस्सीखेच झाल्यानंतर ज्याच्या पदरात उमेदवारी पडेल त्याचा एकदिलाने प्रचार केला जाईल का, हा मोठा प्रश्न आहे.  

जुनी भवानी पेठ, पर्वती आणि हडपसरच्या काही भागाचा समावेश पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. हा सर्व धर्मीयांचा मतदारसंघ आहे. मुस्लीम, दलित, ख्रिश्चन समाजाचे लक्षणीय मतदान येथे आहे. हा मतदार कॉंग्रेसला मानणारा समजला जातो. कॉंग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपाला तगडा उमेदवार मिळाला. २०१४ ला असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यामुळे भाजपाला फायदा झाल्याचे सांगण्यात आले. परंतु २०१९ ला पुन्हा भाजपने या मतदारसंघात बाजी मारली. असे असले तरी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा केवळ ५ हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात २०२४ च्या निवडणुकीत रमेश बागवे यांनी उमेदवारी दावा सांगितला आहे. परंतु २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राहिलेले रमेश बागवे हे पराभूत झाले आहेत. जयपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात दोनदा पराभूत झालेल्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही, असा ठराव करण्यात आला होता. तोच 'फॉर्म्युला' महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे. या 'फॉर्म्युल्या'च्या आधारावर रमेश बागवे यांना तिकीट देता येणार नाही, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. हाच धागा पकडत शिंदे यांनी बागवे यांना शह देण्यासाठी येरवडा भागात ज्यांचे राजकीय करिअर घडले असे शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला आहे. या मतदारसंघात दलित समाजासह इतर समाजाची मते साळवे यांना मिळतील असा विश्वास शिंदे यांना आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी कॉंग्रेसमधून मिळेल, असे सांगितले जात आहे. दरम्यान अविनाश बागवे हे उच्च शिक्षित असून ते परदेशातून शिक्षण घेऊन आले आहेत. त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये चांगली आहे. तसेच त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यकाल गाजवला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून बाप की बेटा कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १३,२९७ चे मताधिक्य मिळाले होते. याचा फटका भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी २०१४ ला त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसाच बदल पुन्हा होणार असल्याची चर्चा आहे. दिलीप कांबळे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपपुढे फक्त उमेदवार बदलीचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये मोठी मारामार असल्याने अंतर्गत गटबाजी जोरात सुरू आहे. याचा फायदा भाजपला होईल, असे मतदारांचे मत आहे. लोकसभेला मतदारसंघातील मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला आहे, असे मानले जात आहे. याचा योग्य फायदा कॉंग्रेसने करून घेतला तर भाजपला जोरदार टक्कर दिली जाऊ शकते. तसेच विधानसभेचा निकाल बदलू शकतो, असे मानले जात आहे.

बागवे पिता-पुत्रांपैकी मैदानात कोण उतरणार?

दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठांनी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर पुणे काँग्रेस भवनात सात जणांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात सुनील भोसले, छाया जाधव, रवींद्र आरडे, लताबाई राजगुरू, सुजित यादव, मिलिंद अहिरे यांचा समावेश असल्याची माहिती कॉंग्रेसने दिली होती. याव्यतिरिक्त काही जणांनी पुणे काँग्रेस भवनात अर्ज न करता थेट मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात अर्ज केला असल्याचं समोर आलं आहे. माजी मंत्री रमेश बागवे यांनी आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पुणे कॅन्टोन्मेंटमधून विधानसभा लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बागवे पिता-पुत्रापैकी यंदाच्या विधानसभेच्या मैदानात कोण उतरणार, याकडेदेखील मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

बागवे भाजपमध्ये जाणार?

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या पाठोपाठ त्यांचे निकटवर्तीय भाजपमधील जातील असे अंदाज व्यक्त केला जात आहे. चव्हाण यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू अशी रमेश बागवे यांची ओळख आहे. यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. तशी चर्चादेखील आहे. पण भाजपमध्ये गेले तरी त्यांना उमेदवारी मिळेल का, हादेखील प्रश्न आहे. २०१९ मध्ये बागवे यांना ५ हजार मतांनी पराभव करावा लागला होता. बागवेंचा विजय सहज शक्य होता पण वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांमुळे मतविभागणीचा फटका त्यांना बसला. असे असले तरीमागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदारांनी दिलेला कौल बघता बागवे धोका पत्करणार नाहीत, असे वाटते. भाजपमध्ये गेले तर महापालिकेतील बागवे यांचा स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षाचा इतिहास बघता त्यांना भाजपमधून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघातील मुख्य प्रश्न

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डला मिळणारा निधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून मिळण्यास अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यातही समस्या येत आहेत. आमदार किंवा खासदारांनी निधी आणण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही, असे मतदारांचे म्हणणे आहे. मतदारसंघात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य व्यवस्थेची अवस्था दयनीय झाली आहे. वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. घोरपडीतील एका रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाचे काम झाले मात्र, दुसऱ्या स्थानकावरुन उड्डाणपूल होणे आपेक्षित आहे. या प्रश्न इतर पायाभूत सुविधांची आवस्था वाईट आहे.

अशी आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा   मतदारसंघाची जातीय रचना

पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. येथे अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे ५५, ७५९ म्हणजे  १९.७३ टक्के आहे. मुस्लीम मतदारांची संख्या त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ६० हजारांच्या घरात  (२०.७ टक्के) आहे. ख्रिश्चन समाज ३ टक्के इतका आहे.

या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुकांना अर्ज सादर करण्यास पक्षाने सांगितले, त्यावेळी वडिलांसह मीदेखील अर्ज केला आहे. सरते शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असणार आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यापूर्वीपासून आम्हाला विचारणा केली जात होती. चव्हाण यांनीदेखील भाजपमध्ये येण्यासंदर्भात विचारणा केली होती. परंतु कॉंग्रेसच्या तसेच पुरोगामी विचारांनुसार जडणघडण झाली असल्याने आम्ही थेट नकार दिला. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा संबंध येत नाही. मतदारसंघाच्या रचनेनुसार निवडणुकीला सामोरे जाताना कोणीतीही अडचण येणार नाही.  - अविनाश बागवे, माजी नगरसेवक, काॅंग्रेस

आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडी या मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या शोधात असल्याने माझ्या नावाची शिफारस केली गेली. नगरसेवक म्हणून अनुभव आणि तळागाळातील व्यक्ती आणि विश्वासार्हता हे महत्वाचा मानला जातो.  उमेदवारी देताना समाजाचा पाठिंबा महत्वाचा मानला गेला आहे. या मतदारसंघातील विविध समाजाचा मला पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे. कॉंग्रेसमधून मला तिकीट मिळेल असा विश्वास आहे.

- अविनाश साळवे, माजी नगरसेवक

विधानसभा निवडणूक २०१९

उमेदवार             पक्ष      मते

सुनील कांबळे (भाजप) ५२,१६० (४१.२ टक्के)

रमेश बागवे (कॉंग्रेस) ४७,१४८ (३७.२ टक्के)

लक्ष्मण आरडे (वंचित) १०,०२६ (७.९ टक्के)

हिना मोमिन (एमआयएम) ६,१४२ (४.९ टक्के)

मनीषा सरोदे भिसे (मनसे) ३,०७५ (२.४ टक्के)

ही जागा भाजपने ५,०२२ मतांनी जिंकली

विधानसभा निवडणूक २०१४

उमेदवार            पक्ष        मते

दिलीप कांबळे (भाजप) ५४,६९२ (३९.६६ टक्के)

रमेश बागवे (कॉंग्रेस) ३९,७३७ (२८.८१ टक्के)

परशुराम वाडेकर (शिवसेना) १६,५०८  (११.९७ टक्के)

अजय तायडे (मनसे) १४,६४२  (१०.६२ टक्के)

भगवान वैराट (राष्ट्रवादी) ५,२९५ (३.८४ टक्के)

मिलिंद अहिरे (बसप) २,९९४ (२.१८ टक्के)

ही जागा भाजपने १४,९५५ मतांनी जिंकली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest