संग्रहित छायाचित्र
दुचाकीस्वाराला वाचविताना कार फुटपाथवरील झाडाला धडकून झालेल्या अपघातात युवतीचा मृत्यू झाला. तर तिचे मित्र- मैत्रीण अपघातात जखमी झाले आहे. गुरूवारी पहाटे पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.
ऋतुजा भालेराव (वय २२, रा. सध्या विमान नगर, मुळ औरंगाबाद) या युवतीचा मृत्यू झाला आहे. तर चालक प्रतीक गोळे (वय २७, रा. नरे आंबेगाव मूळचा सातारा) व ऋतिका शर्मा (वय २४, रा. विमान नगर) हे दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक, ऋतिका आणि ऋतुजा हे एकाच कंपनीत कामाला आहेत. गुरूवारी हे तिघे प्रतिकच्या कारने संगमवाडी रस्त्याने पुण्याकडे जात असताना अचानक एक दुचाकीमध्ये आली. दुचाकीला वाचवत असताना कार डाव्या बाजूला असणाऱ्या फुटपाथवरील झाडाला धडकली. धडकेमुळे झाड तुटून कार त्यामध्ये अडकली होती. कारच्या मागील सीटवर ऋतुजा बसली होती. तिघेही जण या अपघातात जखमी झाले होते.
मात्र ऋतुजा हिला जबर मार लागला होता. घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल व नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ऋतुजा हिचा मृत्यू झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.