अजित पवार
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या जागेसाठी लोकसभा निवडणूक लागणार की नाही याबाबत अनेक संभ्रम होते. मात्र, आता पुण्यात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक लागणार असल्याचे सांगितले आहे.
“लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता एक वर्ष बाकी असताना निवडणूक लागणार नाही, असे मला वाटले होते. परंतु माझ्या आतल्या गोटातील माहितीनुसार आता पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागणार आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. आज अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आम्ही महापालिकेत हे दाखवून दिले आहे. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे.
मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दाव्याने नव्याने चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपविरोधात 40 वर्षांनी विजय खेचून आणला त्यामुळे आता ही जागा महाविकास आघाडीकडून कोणाला दिली जाते, हे पाहणं महत्वाचं आहे.