थेट परदेशातून मतदानासाठी पुण्यात
पुणे : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता थेट विदेशातून पुण्यात काही नागरिक आले होते. स्वखर्चाने विमानाने भारतात आलेल्या या नागरिकांचे सर्वांनी कौतूक केले. या मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
अबुधाबी येथून मतदान करण्यासाठी नरेन्द्र कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सुरेखा कुलकर्णी पुण्यात आल्या होत्या. गुलटेकडी येथील महर्षीनगरमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी कुलकर्णी दाम्पत्य म्हणाले, की देहातून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. या देशाप्रती आपली काही कर्तव्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे मतदान. त्यामुळेच आम्ही अबुधाबीवरुन मतदानासाठी पुण्यात आलो आहोत. दरम्यान, प्रत्येक निवडणुकीदरम्यान मतदानासाठी आम्ही भारतात येतो असे त्यांनी सांगितले.
यासोबतच अमेरिका येथील फ्लोरिडा स्टेटमधील ऑर्लंडो येथे राहणारे पुष्पा सरवदे आणि बाळकृष्ण सरवदे हे दाम्पत्य पुण्यात मतदानाकरिता आले होते. कर्वेनगरमधील शैलेश सोसायटीत असलेल्या सेवा सदन केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सरवदे दाम्पत्य म्हणाले, की मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आपण सर्वांनी उत्तम सेवा आणि सुविधा, विकास आणि भविष्यकालीन स्थिरता याकरिता मतदान करणे आवश्यक असते. त्याकरिता आम्ही अमेरिकेहून मतदानासाठी पुण्यात आलो आहोत.
तर, सध्या नोकरी निमित्त जर्मनी येथील फ्रँकफ्रुट येथे राहणाऱ्या अनुज देशपांडे आणि सानिका अनुज देशपांडे या दाम्पत्याने पुण्यात येऊन मतदानाचा हक्क बजावला. कर्वेनगर येथील ज्ञानदा प्रशालेमध्ये अनुज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर, सानिका यांनी शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालयात मतदान केले. देशपांडे कुटुंबीय कर्वेनगरमधील कुलश्री कॉलनीमध्ये राहण्यास आहे. मात्र, सध्या ते नोकरी निमित्त जर्मनीमध्ये राहण्यास आहेत. अनुज हे आयटी अभियंता आहेत. तर, सानिका या गृहिणी आहेत. केवळ विधानसभेचे मतदान करण्यासाठी ते भारतात आले आहेत.