काँग्रेस जाहिरनाम्याच्या विरोधात चक्क 'अंडरवेअर जाळा' आंदोलन
पुण्यामध्ये काहीही घडू शकतं. कोणताही मुद्दा आंदोलनाचा होऊ शकतो म्हणतात ते खरं आहे. पुण्यातील काही जणांनी चक्क अंडरवेअर जाळा आंदोलन केले. ते ही का तर काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याला विरोध करण्यासाठी. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात खास महिलांसाठी लाभाच्या योजनांचे आश्वासन दिले आहे. त्याचा निषेध या आंदोलनातून करण्यात आला.
सेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशन (SIFF) ने महिलांसाठी लाभाच्या योजनेचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांच्या निषेधार्थ सर्व पुरुषांना त्यांचे अंतर्वस्त्र जाळण्याचे आवाहन केले. अनेक पुरुषांनी आपली अंतर्वस्त्रे जाळली.अर्धवट जळालेली अंतर्वस्त्रे काँग्रेस पक्षाकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम १५ चा वापर राजकारण्यांकडून पुरुषांनावर अन्याय करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यापासून राज्यघटनेचे कलम १५ रोखते. मात्र, याच कलमाच्या पोटकलम ३ नुसार राजकारण्यांना खास महिलांसाठी धोरणे राबविणे किंवा कायदे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुरुषांसाठी कोणतेही विशेष कायदे किंवा योजना राबविल्या जात नाहीत.
एसआयएफएफचे पुणे शहर अध्यक्ष राजेश वखारिया ‘ सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले, महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राहूल गांधींकडून केला जात आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गरीब महिलेला दरमहा ८ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने महिलांना अशाच प्रकारचे आश्वासन दिले होते. हा पुरुषांविषयी भेदभाव आहे. मग या पक्षाला पुरुषांनी मतदान का करावे? महिलांना मोफत बसप्रवास, दरमहा रक्कम एवढेच देऊन राहूल गांधी थांबणार नाहीत. यामुळे समाजात फुटीरतेची भावना वाढीस लागून फुटीरता आणि सामाजिक अशांतता निर्माण होईल. यातून मूलभूत लोकशाही तत्त्वांचेही स्पष्ट उल्लंघन होत आहे.
एसआयएफएफचे समुपदेशक सागर गुंथल म्हणाले, राहुल गांधी आणि घटनेच्या कलम १५ च्या निषेधार्थ पुरुषांना त्यांचे अंतर्वस्त्र जाळण्याचे आवाहन केले आहे. पुरुषांविषयी भेदभाव थांबवण्यासाठी या कलमात सुधारणा करण्याची घोषणा भाजपने करावी, अशी आमची मागणी आहे. कलम १५ मुळे भारतात पुरुषावरील बलात्कार कायदेशीर आहे. एखाद्या पुरुषाने दुसऱ्या पुरुषावर किंवा स्त्रीने पुरुषावर बलात्कार केल्यास पोलिस बलात्काराची तक्रार घेत नाहीत. जर एखाद्या पुरुषाला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला तर त्याला प्रतिबंधात्मक आदेश मिळू शकत नाही.”