वाघोली सांडपाणी समस्या, बैठक गोंधळात; नागरिकांचा संताप
वाघोली येथील केसनंद फाट्यावरील मोकळ्या जागेत (Wagholi) साचत असलेले सांडपाणी व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या (Weste Water) यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PMC), पीएमआरडीए, (PMRDA)महसूलचे अधिकारी बैठकीसाठी एकत्र आले होते. मात्र एकमेकातील ताळमेळा अभावी, अधिकारी, नागरिक व काही सोसायटी धारक यांच्या गोंधळातच बैठक झाली. पुणे नगर रस्त्याचे काम केलेला ठेकेदार पुढे वाहिन्या टाकून ती समस्या सोडविण्यासाठी तयार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला त्वरित पत्र देण्याची गरज आहे. मात्र ज्या ठिकाणी काम करायचे आहे ती हद्द पीएमआरडीए ची असल्याने प्रथम पीएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देणे गरजेचे आहे.
पुणे नगर महामार्गाच्या पावसाळी पाण्याच्या वाहिनीला काही सोसायटयानी सांडपाणी वाहिनी जोडल्याने हे पाणी केसनंद फाट्यावरील मोकळ्या जागेत जमा होऊ लागले आहे. तेथून ते पाणी केसनंद रस्त्यावर येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी तर पसरली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर खड्डेही पडले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. या वर तोडगा काढण्यापेक्षा प्रत्येक विभाग एकमेकावर ढकलण्याचे काम करीत होते. आमदार अशोक पवार यांनी आपल्या कार्यालयात सर्व विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलविली. मात्र पवार अनुपस्थित राहिल्याने गोंधळात बैठक पार पडली.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत पुणे ते शिरूर रस्त्याचे रुंदीकरण करणारा ठेकेदार पुढे वाहिन्या टाकून काम करण्यास तयार आहे. त्याच्या प्रतिनिधीने तसे बैठकीत सांगितले. मात्र लगेच ठेकेदाराला पत्र देऊन काम करू असे सांगण्यास अधिकारी पुढे आले नाही. नागरिकांनाच पुढाकार घेऊन पत्र द्या म्हणून विनवणी करावी लागली. बैठकीसाठीही अधिकारी आपल्या वेळेनुसार आले. यावेळी नगररोड क्षेत्रीय अधिकारी अधिकारी सोमनाथ बनकर, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पुणे महापालिकेच्या संबंधित विभागाचे काही अधिकारी, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामकृष्ण सातव, किसन जाधव, कल्पेश जाचक, शिवदास पवार, प्रसाद केळकर, आदिंसह वाघोली ग्रामस्थ उपस्थित होते.
महापालिकेने उपायोजना करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पावसाळी गटार लाईन मध्येच टाकली दगड माती हे पाणी बंद व्हावे यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी एका चेंबरमध्ये रात्री दगड माती व राडारोडा टाकला. यावर आमच्याकडे काहीच दुसरा पर्याय नव्हता अशी कबुलीही अधिकाऱ्यांनी दिली.
आम्ही खरकटे काम का करायचे ?
वाघोलीत वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटल पर्यंत पीएमआरडीएने चार वर्षांपूर्वी रुंदीकरण केले. त्यानंतर पुणे ते शिरूर दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण केले. एका नागरिकाने ठेकेदाराला पत्र द्या अशी विनंती अधिकाऱ्याकडे केली असता आम्ही खरकटे काम का करायचे असे उत्तर त्यांनी दिले. तर वाघोलीत कोणतेही काम असले की तिन्ही विभाग एकमेकाकडे बोट दाखवतात. नागरिकांचा हा नेहमीचा अनुभव असल्याचे कल्पेश जाचक, किसन जाधव, विठ्ठल शिवरकर, बाळासाहेब शिंदे या नागरिकांनी सांगितले.
वाघोली ग्रामस्थांचा रस्ता असो किंवा ड्रेनेज सर्वच विभागातने फक्त वाघोली करांचा फुटबॉल केलाय.पीएमसी, पीडब्ल्यूडी ,पीएमआरडीए आणि पीएमसी मुख्य विभाग एकमेकांकडे फक्त बोट दाखवण्याच्या पलीकडे काही काम करत नाही.ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल.
- शिवदास पवार (सामाजिक कार्यकर्ते )
ड्रेनेज पाण्यावर प्रक्रिया केल्यावर हेच पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वापरता येइल, स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय नको, सर्वांनी एकत्र येत चर्चा करणे गरजेचे आहे. वाघोलीतील समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे.
-रामकृष्ण सातव (बाजार समिती सदस्य)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.