पक्षानंतर वीजपुरवठ्याचे विघ्न, वनाझ ते रुबीहॉल मेट्रो पुन्हा २१ मिनिटे बंद
काही दिवसांपुर्वीच पक्षाची धडक लागल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पुणे मेट्रो तब्बल २१ बंद पडली होती. आता पुन्हा एकदा मेट्रो बंद पडल्याची घटना समोर आली आहे. पुणे मेट्रोची वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील सेवा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्यामुळे अचानक ठप्प झाली. त्यामुळे मार्गावरील गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी २१ मिनिटे उभ्या होत्या. सकाळी कार्यालयाला निघालेल्या प्रवाशांना अर्धा तास मेट्रोमध्ये अडकून पडावे लागले. तांत्रिक कारणामुळे वारंवार मेट्रोची सेवा बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
वनाज ते रुबी हॉल मार्गावरील मेट्रो सेवा शुक्रवारी सकाळी १०.३१ ते १० वाजून ५२ मिनिटांपासून अचानक बंद होती. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रो बंद असल्याचे चित्र दिसून आले. एक गाडी तर संगम पुलाजवळ ट्रॅकवर उभी होती. नेमके काय झाले, हे प्रवाशांना समजत नव्हते. सुमारे २१ मिनिटे गाड्या जागेवर उभ्या होत्या. मेट्रो का बंद पडली, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
तब्बल २१ मिनिटांनी वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, नंतरही मेट्रोची यंत्रणा काहीशी कोलमडलेलीच होती. स्क्रीनवर शेड्युल टायमिंग बिघडल्यामुळे काहीठिकाणी स्क्रीन बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांनाही मेट्रो कधी येणार, याबाबत माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. यामध्ये मेट्रो प्रशासनाचीही चांगलीच दमछाक झाली. मेट्रो बंद पडल्यामुळे सकाळी कार्यालयाला जाणाऱ्या नोकरदारांना आणि शाळा- कॉलेजसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला होता. दरम्यान, ३ ऑक्टोंबर रोजी मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकला होता. त्यामुळे, मेट्रो सेवा तब्बल २१ मिनिटे बंद होती. आता पुन्हा तशाच प्रकारची घटना समोर आल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.