संग्रहित छायाचित्र
पुणे : कायद्यानुसार २४० दिवस भरल्यानंतर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या आदेशाला पीएमपी संचालक मंडळाने डावला आहे. त्यामुळे पीएमपीचे तब्बल दोन हजार कर्मचारी सेवेत कायम होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
औद्योगिक रोजंदारी आदेश अधिनियम १९४६ पीएमपी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याप्रमाणे कामगार आयुक्तलयाने दिलेल्या आदेशानुसार रोजंदारीवरील कर्मचाऱ्याला सेवेत कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी लागते. मात्र आदेशाकडे पीएमपीच्या संचालक मंडळाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. या आदेशानुसार सेवेत कायम करण्याकडे दोन हजार कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये चालक, वाहक, हेल्पर आदी प्रकारच्या सेवकांचा समावेश आहे.
कायद्यानुसार पीएमपीतील ज्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी अखंड २४० दिवस सेवा केली असेल त्यांना कायम केले जाते. मात्र अनेकवेळा मागणी करुन देखील याकडे दुर्लक्ष केले जात नसल्याचे दिसून येत आहे. पीएमपीचे माजी व्यवस्थापीक संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताेव पीएमपी संचालक मंडळाच्या मंजूरीसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. याबाबतची नोंद बैठकीच्या इतिवृत्तात उपलब्ध आहे. बकोरिया यांनी घेतलेल्यानिर्णयामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत याचर्चा होईल आणि सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा होईल. असे रोजंदारीवर सेवकांना वाटले होते. मात्र बकोरिया यांची बदली झाल्यानंतर हा विषय पुन्हा कधीच चर्चेला आला नाही. त्यांच्यानंतर आलेल्या संचालकाने हा विषय समोर आणला नाही. की त्यावर चर्चा देखील केली नाही. त्यांचीही बदली झाली. आता नव्याने आलेल्या संचालकांनी तरी हा निर्णय घ्यावा. अशी मागणी रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पुणेकरांची जीवन वाहिनी म्हणून पीएमपीची ओळख आहे. शहरासह ग्रामिण भागातील सुमारे १२ लाख नागरिक दररोज पीएमपी बसने प्रवास करतात. या प्रवाशांना सेवा देण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून केले जाते. ज्यांच्यावर प्रवासी सेवा देण्याचा भार आहे त्यांच्याच समस्या देखील पीएमपी प्रशासन समजून घेत नाही. आज ना उद्या सेवेत कायम होऊ त्यानंतर पगार वाढ होऊन इतर फायदे लागू मिळतील. त्यामुळे संसाराचा गाडा रुळावर आणता येईल. अशी आशा या सेवकांना लागून राहिली आहे. मात्र प्रत्येक वेळी पीएमपीचा वाढता खर्च, होणारा तोटा याचे गणित मांडले जाते. आणि सेवकांच्या कायम करण्याच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला जात नाही. यामुळे या सेवकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत चालली आहे. संचालक मंडळाने या सेवकांना कायम केले तर हेच कर्मचारी आणखी जोमाने चांगले काम करतील. त्यामुळे याचा फायदा पीएमपीलाच होईल. त्यामुळे सेवकांची हजेरी आणि ते करत असलेल्या प्रामाणिक कामाची दखल घेवून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सीविक मिररशी बोलतान सेवकांनी केली.
कायद्यानुसार सेवकांना २४० दिवस अखंड सेवा केल्यानंतर त्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्यावे लागते, हे खरे आहे. मात्र अद्याप संचालक मंडळाच्या बैठकीत यावर कोणताही चर्चा झाली नाही. कर्मचाऱ्यांचे पत्र मिळाले आहे, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक
पीएमपी प्रशासनाकडे रोजंदारीवरील सेवकांना कायम करण्याची मागणी अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेवकांवर अन्याय होत आहे. कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा आदेश आहे. याचे पालन पीएमपीच्या संचालक मंडळाने करावे.
- सुनिल नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन.
पीएमपीएम एकूण बस - २०८९
स्वमालकीच्या बस - ९९१
ठेकेदारांच्या बस - १०९८
पीएमपीचे मनुष्यबळ
चालक - २९५०
वाहक - ४७००