पुणे-नगर महामार्गावर दोन पीएमपीएमएल बसची धडक, २९ प्रवाशी जखमी
पुणे-अहमदनगर महामार्गावर दोन पीएमपीएमएल बसची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ प्रवाशी जखमी झाले आहेत. तळेगाव ढमढेरेवरून मनपाला जाणाऱ्या बसला वाघोलीवरून येणाऱ्या बसची धडक बसली. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नतावाडी डेपोची बस (CNG 659 मार्ग क्रमांक 159/8) ही बस तळेगाव ढमढेरेवरून महापालिकेकडे येत होती. यावेळी पुणे-नगर महामार्गावरील जनक बाबा दर्ग्याच्या अलीकडे बीआरटीमध्ये विरुद्ध दिशेने येणारी वाघोली डेपोची बस (क्रमांक E 164 चालक क्र WT 322 मार्ग 236/2) ही बस भरधाव वेगात समोरून धडकली.
या अपघातात बस वाहक यांच्यासह २९ जण जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमींना हाताला, तोंडाला, पायाला मार लागला आहे. यात ८ महिला असून १७ प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत. सध्या तरी कोणी गंभीर जखमी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.