रस्त्यांच्या कामांसाठी दोन हॉटमिक्स प्लांट उभारणार
अमोल अवचिते
पुणे शहरातील (Pune) रस्त्यांवर सर्वत्र आढळणारे खड्डे बुजवणे तसेच रस्त्यांचे नुतनीकरण यासाठी महापालिकेतर्फे (PMC) दोन हाॅटमिक्स प्लांट (Hotmix Plants) उभारण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी बुधवारी (दि. ११) याबाबत माहिती दिली. शहरात वाहतुकोंडीमुळे(Traffic jam) नागरिक त्रासले आहेत. तसेच शहरीकरण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे रस्त्यांचा विस्तार करण्यात येत आहे. असे असताना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘‘रस्ते दुरूस्तीसाठी दोन नवीन हॉटमिक्स प्लांट शहरात उभारण्यात येणार आहेत. हॉटमिक्स प्लँट उभारणीसाठी महापालिकेने पाच कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. येत्या चार महिन्यांत हे प्लांट उभारण्यात येतील,’’ असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
शहरासह उपनगर भागात रस्त्यांचे जाळे वाढत आहे. शहरामध्ये सुमारे दीड हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आहेत. सिमेंटच्या रस्ते उभारले यापैकी बहुतांश रस्ते हे डांबरी आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. आता पुन्हा रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्याव्यतिरिक्त उर्वरित आठ महिन्यांत करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण मोठे असल्याने खड्डे दुरूस्तीसाठीही डांबर मिश्रण आवश्यक असते. सध्या महापालिकेचा येरवडा येथे एकमेव हॉटमिक्स प्लांट असून शहराच्या विविध भागात डांबर मिश्रण पाठवताना ते पुरेसे गरम राहत नाही. अशातच हा प्लांट जुना असून सातत्याने ब्रेक डाउनमुळे खड्डे दुरूस्ती तसेच रस्ते नुतनीकरणाची कामे ठप्प होतात. याचा फटका लाखो वाहन चालकांना बसतो.
या पार्श्वभूमीवर शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले दोन स्वतंत्र हॉट मिक्स प्लांट उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘‘शहराचा विस्तार पाहता, कामाच्या ठिकाणी कमीत कमी वेळेत डांबर मिश्रण पोहोचण्यासाठी दोन स्वतंत्र ठिकाणी हॉटमिक्स प्लांट उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. यासाठीच्या जागांचा शोध अंतिम टप्प्यात असून पुढील चार महिन्यांत हे दोन्ही प्लांट सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. हे दोन नवीन प्लांट सुरू झाल्यानंतर येरवडा येथील जुना प्लांट बंद करून त्याठिकाणीदेखील अत्याधुनिक प्लांट उभारण्यात येणार आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.