संग्रहित छायाचित्र
वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हीच बाब लक्षात घेत अशा ३५ हजार बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्येमुळे वाहतूक पोलीस त्रासले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलीस गुंतले असल्याचा फायदा घेत अनेक वाहनचालकांकडून पुणे शहर आणि परिसरात वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने गंभीर अपघात घडत आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी तीव्र कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ३० हजार ९२७ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ‘ट्रिपल सीट’ वाहन चालवणाऱ्या तीन हजार ३४१, तर ६३४ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, मोबाइलवर संभाषण, एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालवणे, मोटार चालवताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा, तसेच संबंधिताचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रांत काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रांत विविध चौकांत वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते. शहरात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदवले आहे.
वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात केलेली कारवाई
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे - ३०,९२७
एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास - ३,३४१
मद्य पिऊन वाहन चालवणे - ६३४
शहरात बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. विरुध्द दिशेने वाहन चालवल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या अडीच हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५०० जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला आहे. संबंधित चालकांचा परवाना किमान सहा महिन्यांपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालवण्यास बंदी असणार आहे.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.