वाघोलीमध्ये महामार्गावर चारचाकी वाहन चालक रहदारीस अडथळ निर्माण होईल अशी वाहने सर्रास लावतात.
वाघोली गावाचा तीन वर्षांपूर्वी पालिकेत समावेश झाला. पुणे-नगर रस्त्यावरील महत्त्वाचे उपनगर असलेले वाघोलीचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडींच्या प्रश्नामुळे हैराण झाले आहेत. परिस्थितीनुसार अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांची जागा चारचाकी वाहनांनी घेतली आहे. वाघोली परिसरामध्ये चारचाकी वाहनांच्या झालेल्या वाढीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. चारचाकी वाहने, मोठ्या खासगी प्रवासी गाड्या, चारचाकी, मालवाहतूक करणाऱ्या गाड्यामुळे दुचाकी वाहन चालवणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते आहे. अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून ऐन थंडीतही गर्दीमुळे घाम फुटत आहे.
पुणे-नगर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. परिसरात असलेल्या उद्योग क्षेत्रामुळे वाघोली परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे. महामार्ग असल्यामुळे राज्यासह परराज्यात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ नेहमीच वाघोली गावात असते.
असे असले तरी वाघोलीमधील रस्ते अरुंद आहेत. निरनिराळ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे छोट्या रस्त्यावर वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते.
वाघोलीचा पालिकेत समावेशाबरोबरच लोणी कंद पोलीस स्टेशनचा समावेश शहर पोलिस आयुक्त कार्यालयात झाला. शहर पोलीसांकडे वाहतूक व्यवस्थापन गेल्यामुळे आता तरी वाघोलीचा वाहतुकीचा असलेला प्रश्न मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु वाघोलीकरांचे स्वप्न सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे भंग झाले आहे. पालिकेच्या माध्यमातून झाल्यावर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणे अपेक्षित होते. त्यामुळे रस्ता अधिक रुंद झाला असता. परंतु परिस्थितीमध्ये काडीचाही फरक न पडल्यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंनदिवस वाढतच चालली आहे.
अनेकदा दुचाकी चालक नियमांची पायमल्ली करतात. त्यांच्या बेजबाबदार वाहन चालवण्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडतच असते. या अनेक कारणांमुळे वाघोलीत सदासर्वदा दिवसाचे चोवीस तास गर्दी आणि रस्त्यावर वर्दल पाहायला मिळते. नेहमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढता काढता वाघोलीकर आता हैराण झाले आहेत.
यावर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रण कक्षाने दुचाकी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. पोलीसांच्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांनी धास्ती घेत रस्त्यावर वाहने लावणे बंद केले होते. दुचाकीची जागा चारचाकीने घेतल्यामुळे चारचाकी वाहन चालकांची अरेरावीदेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुचाकी चालकांचा न्याय चारचाकी वाहनाचालकांदेखील लागू करण्यात यावा. चार चाकी वाहन रस्त्यावरच उभे करण्याच्या सवयीला त्याशिवाय जरब बसणार नाही. बेशिस्त वाहन चालक ही वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.
सध्या वाहतूक नियंत्रण विभागाकडे टोइंग क्रेन नाही त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केसनंद,बकोरी आदी ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष उभारूनदेखील काहीच फायदा नाही. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उबाळेनगर ते बकोरी फाटा असे जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतर नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये घालवावे लागत आहे. रोजच्याच वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी गावाकडे जाण्यास नापसंती दर्शविली आहे.
येरवडा येथे वाहतूक विभागाचे उपायुक्त कार्यालय आहे. त्यामुळे वाघोलीच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नागरिकांना तक्रार करायची झाल्यास जवळपास पंधरा किमी अंतर वाहतूक कोंडीतून मार्ग काढवा लागत आहे. वाहतूक कोंडीबाबत त्यामुळे तक्रार देण्यासदेखील अनेकांनी टाळाटाळ केली आहे.
बेशिस्त नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेण्यासाठी लवकरात लवकर टोइंग क्रेन उपलब्ध द्यावी अशी मागणी होत आहे. रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास सोयीस्कर होईल. वाघोलीकर वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्त होतील. असा विश्वास वाघोलीकराकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बेशिस्त दुचाकीवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन कायमस्वरूपी मिळाली आहे. परंतु चारचाकी वाहने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर टोईंग क्रेन नसल्याने वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी टोईंग क्रेन मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली
चारचाकी वाहनांसाठी टोईंग क्रेन नसल्याने चारचाकी वाहनांवर कारवाई करणे अडचणीचे आहे. सध्या रहदारीस अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांचे फोटो काढून दंड आकारणी केली जात आहे. टोईंग क्रेन मिळाल्यानंतर दुचाकी प्रमाणेच कारवाई केली जाईल.
- गजानन जाधव, वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक
सद्य परिस्थिती काय आहे ही सांगण्याची गरज नसून वाहतूक पोलिसांनी लवकर क्रेनची सुविधा उपलब्ध करून चारचाकी वाहनावर कारवाई केल्यास वाघोलीकर निवांत श्वास घेऊ शकतील.
- करण थोरात, सामाजिक कार्यकर्ते