चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, नव्या उड्डाणपुलाचे उद्या गडकरींच्या हस्ते उद्घाटन
पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१२ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे दौऱ्यात गडकरी महत्त्वपूर्ण बैठकही घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता ते चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करतील. त्यानंतर शनिवारी पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक पाषाण येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी कराव्या लागणाऱ्या संभाव्य उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजाजवळ जुलै महिन्यात भीषण अपघात झाला होता. यात तब्बल २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेचा न्यायवैद्यक अहवाल समोर आला असून यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल समोर ठेवूनच शनिवारच्या बैठकीत उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.